CSK vs DC IPL 2026 : नितीश राणा याच्यावर शनिवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.
Nitish Rana Fined CSK vs DC IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्स (DC)चा फलंदाज नितीश राणा (Nitish Rana) याच्यावर शनिवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या अधिकृत निवेदनानुसार, राणावर सामन्याच्या फीच्या 25 टक्के दंडासोबतच लेव्हल 1 उल्लंघनासाठी 1 डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.
मॅच खेळायला नाही, तर नितीश राणावर बीसीसीआयचा थेट ‘हंटर’
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) नेही या प्रकरणात कडक भूमिका घेतली आहे. राणाला आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.3 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. या कलमानुसार,अपमानास्पद किंवा अयोग्य शब्दांचा वापर जे स्टंप माइक किंवा इतर माध्यमातून प्रेक्षकांना ऐकू जाऊ शकतात. हा गुन्हा मानला जातो. रागाच्या भरात स्वतःच्या खेळावर किंवा परिस्थितीवर शिवीगाळ करणेही यामध्ये समाविष्ट आहे. राणाने आपली चूक मान्य करत सामना अधिकाऱ्यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली आहे. विशेष म्हणजे, तो या सामन्यात खेळत नव्हता.
नेमकं काय घडलं? (Nitish Rana Fined CSK vs DC IPL 2026)
ही घटना दिल्लीच्या डावातील 19व्या षटकात घडली. ट्रिस्टन स्टब्स याचे ग्लोव्ह्ज बदलण्याच्या मुद्द्यावरून राणाने चौथ्या पंचाशी वाद घातला. त्यावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी देखील पंचांशी चर्चा करत होते. त्यानंतर लगेचच, 19व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जेमी ओव्हरटनच्या गोलंदाजीवर स्टब्स बाद झाला. पॅव्हेलियनकडे परतताना त्याने संतापाच्या भरात आपला बॅट आणि ग्लोव्ह्ज फेकून दिले.
चेन्नईने दिल्लीला हरवले
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, चेन्नई सुपर किंग्सने (CSK) प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या नाबाद 115 धावांच्या जोरावर 212 धावा केल्या. जेमी ओव्हरटनने आपल्या 4 षटकांत दिल्ली कॅपिटल्सला (DC) 189 धावांवर बाद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे चेन्नई सुपर किंग्सला (CSK) या हंगामातील पहिला विजय 23 धावांनी मिळाला. केएल राहुल आणि पथुम निस्संका यांनी पहिल्या विकेटसाठी 61 धावा जोडून दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, केएल राहुलला या चांगल्या सुरुवातीचा फायदा उचलता आला नाही आणि तो 18 धावांवर बाद झाला, तर निस्संका 24 चेंडूंमध्ये 41 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. संजू सॅमसनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.











