टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Mathura Boat Accident VIDEO : एका क्षणी ओठी भजनं, पुढच्याच क्षणी किंकाळ्या! मथुरा बोट दुर्घटनाग्रस्तांचा शेवटचा व्हिडिओ समोर

On: April 11, 2026 12:36 PM
Follow Us:

Mathura Boat Tragedy Last Video : एका क्षणी बोटीतील पर्यटक भजनं गात होते, व्हिडिओ काढले जात होते, तर पुढच्याच क्षणी ते नदीच्या प्रवाहात सापडले

मथुरा : वृंदावनमध्ये पर्यटकांना घेऊन जाणारी बोट शुक्रवारी दुपारी यमुना नदीत उलटली. या दुर्घटनेत किमान दहा जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता आहेत. बोटीवरील सर्व पर्यटक पंजाबमधील होते. एका क्षणी भजनं गात असलेल्या पर्यटकांच्या ओठी पुढच्याच क्षणी किंकाळ्या आणि आरडाओरडा आला. मृत्यूच्या काही क्षण आधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत १६ ते १७ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे जिल्हाधिकारी चंद्रप्रकाश सिंह यांनी सांगितले.

व्हिडिओमध्ये काय दिसते

एका क्षणी बोटीतील पर्यटक भजनं गात होते, तर पुढच्याच क्षणी ते नदीच्या प्रवाहात सापडले होते. जीव वाचवण्यासाठी निकराची झुंज देत हातपाय झाडत होते. बोट दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेले पर्यटक त्या भयानक प्रसंगाच्या धक्क्यातून अद्यापही सावरलेले नाहीत; नेमकं काय घडलं हे समजून घेताना त्यांची धडपड सुरु आहे. आपल्यापैकी नक्की किती जण सुखरुप बचावले आहेत, याबद्दलही त्यांना खात्री नाही.

वृंदावनचे सर्कल ऑफिसर पीतम पाल सिंग म्हणाले, “लुधियानामधून ३० हून अधिक भाविकांचा एक गट बसने वृंदावनला आला होता. त्यातील काही जण नौकाविहारासाठी गेले असताना हा अपघात घडला. आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून त्यातील काही जण लुधियानाचे आहेत. पाच जण बेपत्ता आहेत आणि इतर अनेकांना सुखरुप वाचवण्यात आले आहे. बचावकार्य अजूनही सुरु आहे.”

 

भजनं गाताना बोट धडकली

जागराँ येथे कपड्यांचे दुकान चालवणारा आणि या अपघातातून बचावलेला चेतन म्हणाला की त्याला पूर्णपणे सुन्न झाल्यासारखं वाटत होतं. “आम्ही सर्व जण बोटीत बसून भजनं गात होतो. आमची बोट कशाला धडकली हे आम्हाला दिसलं नाही; पण अचानकच बोट उलटली आणि आम्ही यमुनेच्या पाण्यात बुडू लागलो. तो प्रसंग अत्यंत भयानक होता. सुदैवाने, नदीकाठावर उपस्थित असलेल्या पाणबुड्यांनी (डायव्हर्स) तात्काळ पाण्यात उडी घेतली आणि आमच्यापैकी अनेकांना वाचवले.”

कोण कोण बचावले हे तुला माहीत आहे का, असं विचारलं असता चेतन म्हणाला, “मला याबद्दल काहीच कल्पना नाही. लोकांची ओळख पटवण्यासाठी मी रुग्णालय आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात सतत चकरा मारत आहे.” जग्राँ येथील एक मायलेकाची जोडी वारंवार वृंदावनला भेट देत असत. त्यांनीच या दुर्दैवी सहलीचं आयोजन केलं होतं. त्यांचाही बुडालेल्यांमध्ये समावेश आहे.

तरंगत्या फलाटाला धडकून उलटली

‘बांके बिहारी क्लब’ने सलग चौथ्या वर्षी ९ ते १२ एप्रिल दरम्यानच्या या सहलीचे आयोजन केले होते. लुधियाना आणि जग्राँ येथील रहिवाशांचा समावेश असलेला हा ग्रुप गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास बसने रवाना झाला आणि शुक्रवारी सकाळी वृंदावनला पोहोचला. यमुनेच्या काठावरील ‘केशी घाटा’वर जाण्यासाठी त्यांनी दोन बोटी घेतल्या; त्यापैकी एक बोट पाण्यावर तरंगणाऱ्या एका तरंगत्या फलाटाला धडकल्यामुळे उलटल्याचे सांगितले जात आहे. मृतांपैकी बहुतांश व्यक्ती लुधियाना येथील आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now