Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प दररोजच्या पत्रकार परिषदांमधून इराणला धमकावतच आहेत. पण आता त्यांनी आपल्याच देशातल्या एका व्यक्तीला इशारा दिला आहे. कारण विषयही तितकाच महत्वाचा, संवेदनशील आहे. इराण-अमेरिका युद्ध आता एका निर्णायक वळणावर आलय.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी इराणमध्ये अडकलेल्या आपल्या दोन जवानांच्या सुटकेसाठी जे रेस्क्यू मिशन राबवलं त्याची माहिती दिली. याचवेळी त्यांनी आपल्या प्रशासनात कोणीतरी घरभेदी असल्याचं मान्य केलं. कारण इराणमध्ये अमेरिकेने जे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं, त्याची माहिती लीक करणारा कोणीतरी त्यांच्या प्रशासनातलाच माणूस आहे. त्यामुळेच पत्रकार या रेस्क्यू ऑपरेशनची माहिती ब्रेक करु शकले. 3 एप्रिल रोजी इराणने इस्फहान प्रांतात अमेरिकेचं अत्याधुनिक F-15E फायटर जेट पाडलं. त्यात दोन जण होते. एक वैमानिक आणि दुसरा वेपन ऑफिसर. अमेरिकेला आपल्या या दोन वायू सैनिकांच्या सुटकेसाठी स्पेशल ऑपरेशन लॉन्च करावं लागलं. अमेरिकेने हे ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी आपली सर्व ताकद झोकली.
पण बातमी ब्रेक करण्याच्या मोहामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले होते. F-15E कोसळल्यानंतर वैमानिकाला स्पेशल फोर्सेसनी लगेच बाहेर काढलं. पण वेपन ऑफिसर इराणच्या हद्दीतच होता. 7000 फूट उंचावरील इराणच्या जाग्रोस पर्वत रांगांमध्ये 24 तासापेक्षा जास्त वेळ त्याला लपून रहावं लागलं. त्याच्या सुटकेसाठी अमेरिकेने रेस्क्यू मिशन लॉन्च केलय ही बातमी टीव्हीवर आल्यामुळे इराणला कळलं की, दुसरा अमेरिकी जवान आपल्या हद्दीतच आहे. त्याला पकडण्यासाठी इराणने आकाश-पाताळ एक केलं. मोठ्या इनामी रक्कमेची घोषणा केली. पण इराणला त्या अमेरिकी सैनिकाला शेवटपर्यंत पकडता आलं नाही. अमेरिकेच्या नेवी सील कमांडो टीमने यशस्वीरित्या हे रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं.

ट्रम्पनी सरळ सांगितलं जेलमध्ये जाण्यासाठी तयार राहा
ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यानेच इतकी संवेदनशील माहिती लीक केल्यामुळेच पत्रकाराला ही बातमी मिळाली. पण ही बातमी बाहेर आल्यामुळे संपूर्ण मिशन धोक्यात आलं. इराणच्या भूमीत असलेल्या त्या जवानासह रेस्क्यू मिशनमध्ये असलेल्या शेकडो सैनिकांचा जीव धोक्यात आलेला. अमेरिकन सैन्य इराणमध्ये आपल्या जवानाचा शोध घेत आहे, ही बातमी ब्रेक करणाऱ्या पत्रकाराला ट्रम्प यांनी कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. “ज्या व्यक्तीने ही बातमी पब्लिश केली. त्याने आपला सोर्स जाहीर केला नाही, तर त्याला तुरुंगात जावं लागेल” अशी धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे.
ट्रम्प यांनी कुठल्या मिडिया संस्थेचं नाव घेतलं नाही. पण ते म्हणाले की, इतकी गोपनीय माहिती बाहेर आल्यामुळे इराणी सुरक्षा पथकांना समजलं की त्यांच्या क्षेत्रात एक अमेरिकी जवान आहे. द न्यूयॉर्क टाइम्स, फॉक्स न्यूज आणि एक्सियोस सारख्या मिडिया संस्थांनी ही बातमी दिली.







