एलपीजी सिलिंडर तुटवट्याच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाने एक नवीन आदेश जारी केला आहे. यामुळे पीएनजी असलेल्या ग्राहकांना सिलिंडर खरेदी करताना समस्या निर्माण होऊ शकतात. अशा ग्राहकांच्या एलपीजी सिलिंडरचा पुरवठा 1 जुलैपासून थांबवला जाईल.

पीएनजी (पाइपद्वारे नैसर्गिक वायू) वापरणाऱ्या ग्राहकांना 70 हजारहून अधिक एलपीजी कनेक्शन्स परत कराव्या लागणार आहेत. या ग्राहकांच्या घरांना होणारा एलपीजी सिलिंडरचा पुरवठा येत्या 1 जुलैपासून बंद केला जाईल. पुरवठा विभागाने ग्रीन गॅस लिमिटेडकडे पीएनजी आणि एलपीजी जोन्ही कनेक्शन्स असलेल्या ग्राहकांची यादी मागवली आहे. आता नवीन नियमानुसार, पीएनजी ग्राहकांना यापुढे एलपीजी कनेक्शन चालू ठेवता येणार नाही. दुहेरी कनेक्शन असलेल्यांचा एलपीजी कनेक्शन बंद केला जाईल. जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद कुमार यांनी सांगितलं की, पुढील तीन महिन्यांत पीएनजी कनेक्शन धारकांच्या घरी एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला जाईल. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने यासंदर्भात एक आदेश जारी केला आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
ज्या रस्त्यांवर, वस्त्यांमध्ये आणि वसाहतींमध्ये पीएनजी पाइपलाइन आहे, तिथल्या लोकांना फक्त पीएनजी कनेक्शन घ्यावं लागेल. घरापासून 300 मीटरच्या परिघात पीएनजी पाइपलाइन असल्यास एका आठवड्याच्या आत कनेक्शन दिलं जाईल. अशा ग्राहकांना कनेक्शनसाठी 6000 रुपयांची सुरक्षा ठेव जमा करावी लागेल. पुढील तीन महिन्यांत 25 हजार नवीन पीएनजी कनेक्शन देण्याचं लक्ष्य असल्याचं डीएसओ आनंद कुमार यांनी सांगितलं आहे. पहिल्या टप्प्यात पाच हजार कनेक्शन दिले जातील.
एकीकडे सरकार आणि प्रशासन एलपीजी पुरवठा सामान्य असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे लोकांचं म्हणणं आहे की व्यावसायिक वापरासाठी 925 रुपये किमतीचा सिलिंडर 1800 ते 2000 रुपयांना काळ्या बाजारात खरेदी करावा लागत आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम देशभरातील घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅल सिलिंडर पुरवठ्यावर झाला आहे. देशातील अनेक भागात सिलिंडरसाठी लांबच-लांब नागरिकांच्या रांगा लागल्याचं सोशल मीडियावर पहायला मिळतंय. इंडियन ऑइल आणि इतर तेल विपणन कंपन्या राज्य सरकारांसोबत मिळून गैरप्रकार टाळण्यासाठी आणि साठेबाजी रोखण्यासाठी काम करत आहेत.
सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजीमध्ये महिनाभरात दुसऱ्यांदा वाढ केल्यानंतर देशभरात त्याच्या किमती प्रति सिलिंडर दोन हजारांपुढे गेल्या आहेत. मात्र घरगुती वापराच्या एलपीजीमध्ये दरवाढ न केल्याने तेल विपणन कंपन्यांना प्रति सिलिंडर 380 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.






