Russia Military Plane Crash : मध्यपूर्वेमध्ये युद्ध अधिक गंभीर वळणावर आलेलं असतानाच महासत्ता रशियाकडून एक अत्यंत भीषण माहिती जारी करण्यात आली. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं ही माहिती जारी केली आणि नेमकं काय घडलं हेसुद्धा सांगितलं…
Russia Military Plane Crash : संपूर्ण जग सध्या एका प्रचंड आव्हानात्मक काळाचा सामना करत असून, ही आव्हानं काही केल्या माघार घेताना दिसत नाहीयेत. विविध कारणांनी जगभरात विविध स्तरावर जिवीत आणि वित्तहानी होत आहे. याच सत्रात आणखी एका भीषण घटनेनं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. रशियातून नुकतंच हे वृत्त समोर आलं आहे. जिथं लष्कराच्या विमानाचा भयंकर अपघात झाल्याची माहिती सरकारनं जारी केली आहे.
TASS वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं 1 एप्रिल 2026 रोजी जारी केलेल्या माहितीनुसार रशियाई एंटोनोव्ह 26 हे लष्करी विमान क्रिमीयानजीक उड्डाण भरलेलं असतानाच अचानक जमिनीच्या दिशेनं उतरत आदळलं. प्रचंड भीतीदायक स्वरुपातील या अपघातामध्ये विमानातील सर्व 29 जणांचा मृत्यू ओढावला.
तातडीनं घटनास्थळाची माहिती मिळवली आणि…
रशियाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीत सांगण्यात आलं की, ’31 मार्च रोजी साधारण सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास An-26 या लष्करी विमानाशी असणारा संपर्क कुटला. क्रिमियावरून उड्डाण घेतानाच हा संपर्क तुटला.’ बचावदलानं या अपघाताची माहिती मिळताच तातडीनं घटनास्थळाची माहिती मिळवली आणि तिथं धाव घेतली.
दरम्यान, घटनास्थळाहून समोर आलेल्या माहितीनुसार विमानातील चालकदलात असणारे 6 जण आणि 23 प्रवाशांचा या अपघातात मृत्यू ओढावला. विमानाचे अपघातग्रस्त अवस्थेतील अवशेष आणि त्याचा बाह्य भाग पाहता कोणत्याही हल्ल्याची चिन्हं त्यावर दिसत नाहीत. त्यामुळं हा हल्ला नाही हे स्पष्ट होत आहे. तांत्रिक बिघाडामुळं विमान कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
AN-26 हे विमान बनवणाऱ्या एंटोनोव्ह कंपनीनुसार AN-26 या विमानांची निर्मिती कीवमध्ये करण्यात आली होती. हे एक AN सीरिजमधील विमान आहे ज्याचे 1969 ते 1986 दरम्यान 1398 मॉडेल बनवण्यात आले होते. ही विमानं रशियानं हंगेरीपासून क्यूबालाही विकली होती.









