Devendra Fadnavis On Ajit Pawar: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमात विविध विषयांवर भाष्य केलं.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या काळात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अनेक चर्चा देखील समोर आले. अजित पवार-शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांच्या बैठकीचा व्हिडिओही व्हायरल झाला. त्यात सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी इतकी घाई का करण्यात आला? यावरून विरोधकांनी टीका देखील केली, त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीचा होता. तो आम्ही घेतला नव्हता असं सांगत मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमात विविध विषयांवर भाष्य केलं.(Devendra Fadnavis On Ajit Pawar)
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्याबाबत जो निर्णय घेतला गेला त्यात आमच्या पक्षाचा सहभाग नव्हता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते नेत्यांनी मला माहिती दिली. कागदपत्रांसह ते नेते माझ्याकडे आले आणि त्यांनी एक तारीख दिली. त्यावर माझा कुठलाही आक्षेप नव्हता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनंती केली आणि ते आम्ही मान्य केले. तो निर्णय हा त्यांच्या पक्षाचा होता, आमचा निर्णय नव्हता असंही त्यांनी सांगितलं आहे.तसेच विलीनीकरणाबाबत बैठकीचा व्हिडिओ समोर आला त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात पक्षात विलीनीकरणाची चर्चा सुरू होती तर त्याच्याशी आमचा संबंध नव्हता. जर असा निर्णय झाला असता तर अजितदादांना आमचा सल्ला घ्यावा लागला असता कारण आम्ही मित्रपक्ष आहोत. परंतु माझ्यासोबत अजितदादांची अशी कुठलीही चर्चा झाली नव्हती. जर काही सीक्रेट असेल तर त्याबाबत माहिती नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अपघात की घातपात यावरूती फडणवीस म्हणाले की…
रोहित पवारांनी ज्या शंका उपस्थित केल्या, त्यावर बोलताना रोहित पवार यांनीही आज माझी भेट घेऊन काही मुद्दे मांडले आहेत. त्यांनी दिलेल्या पत्राला मी माझे पत्र जोडून या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी डीजीसीएकडे करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर, ह्या अपघातावर तुम्हाला संशय वाटतो का? असाही प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता. त्यावर, जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा आपण कुठलीही पतंगबाजी करायला नाही पाहिजे. कारण, हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असतो. दुर्दैवाने जी व्यक्ती मृत आहे, त्या व्यक्तीच्या पद-प्रतिष्ठेचाही विचार आपण करायला पाहिजे. तसेच, कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेचाही विचार करायला पाहिजे. त्यामुळे, याविषयी कुठलीही पतंगबाजी किंवा हवेत गोळीबार करायला नाही पाहिजे, असे मला वाटते, अशा शब्दात फडणवीसांनी उत्तर दिले. त्यामुळे, याप्रश्नावर मी अधिक बोलू इच्छित नाही.








