MSRTC NCMC Card: एसटीचा प्रवास करताना आतापर्यंत आधारकार्डवर सवलतीचा प्रवास करताना कोणत्याही अडचणी येत नव्हत्या. मात्र, एसटी महामंडळाने एनसीएमसी कार्ड प्रवाशांसाठी आणले आहे.
पुणे: आधार कार्ड किंवा साधे ओळखपत्र दाखवून निम्म्या तिकिटात प्रवास करणाऱ्या महिला आणि शंभर टक्के सवलतीचा आनंद घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता सवलतीच्या प्रवासासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) अनिवार्य करण्यात आले आहे. या कार्डशिवाय आता सवलतीची लालपरी गाठणे कठीण होणार आहे. खिशात कार्ड नसेल, तर प्रवासासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे सुरुवातीला तरी प्रवाशांना त्रास सहन होणार आहे.या कार्डमुळे प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पूर्णपणे पारदर्शक होणार असल्याचा दावा केला जात आहे. सवलतीची अचूक नोंद, रोखविरहित व्यवहार आणि पारदर्शक प्रतिपूर्ती ही तिन्ही वैशिष्ट्ये एकाच कार्डमध्ये असतील. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून हा बदल करण्यात आला आहे. शिवाय कॅशलेस प्रवासाला चालना देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
प्रशासनाने हा निर्णय पारदर्शकतेसाठी घेतला असला, तरी ग्रामीण भागातील चित्र मात्र वेगळे आहे. रांगेत उभे राहून कार्ड काढणे, ते वेळेवर रिचार्ज करणे आणि तांत्रिक अडचणी हाताळणे यामुळे ग्रामीण महिला व ज्येष्ठ प्रवाशांची मोठी ससेहोलपट होणार आहे. केवळ आधार कार्डवर मिळणारी सवलत आता इतकी किचकट का केली, असा संतप्त सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
असे वापरायचे कार्ड -प्रवाशांना एनसीएमसी कार्डसाठी १९९ रुपये मोजावे लागणार आहेत.
-जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास सवलतीच्या दरात म्हणजेच १४९ रुपयांत नवीन कार्ड दिले जाणार आहे
-हे कार्ड केवळ ओळखपत्र नसून ते एक प्री-पेड वॉलेट असेल.
-यामध्ये किमान १०० रुपयांचा बॅलन्स ठेवणे बंधनकारक असून, प्रवाशांना ५० रुपयांच्या पटीत ते रिचार्ज करता येईल