नगरपालिका निवडणुकीत आबांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष
सांगोला ;
सांगोला शहर आणि परिसरातील अनेक वर्षे सोबत काम करणारे ज्येष्ठ सहकारी, नगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि महत्त्वाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा आणि विचार विनिमय करून नगरपालिका निवडणुकीबाबत पुढील दिशा ठरवणार तसेच युती आणि आघाडी बाबतचा निर्णय घेणार असे प्रतिपादन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले. सांगोला शहरात पूर्वीपासूनच दिपकआबा गटाचे वर्चस्व असल्याने दिपकआबांच्या भूमिकेकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
गतवेळी पार पडलेल्या सांगोला नगरपरिषद निवडणुकीत सांगोला शहरातील सर्वात मोठा पक्ष किंवा गट म्हणून दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गटाला यश मिळाले होते. त्यांच्या विचारांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे दिपकआबा आघाडीबाबत कोणती भूमिका घेतात यावर नगरपालिका निवडणुकीची समीकरणे अवलंबून असणार आहेत.
संबंधित बातम्या
यावेळी बोलताना माजी आमदार दिपकआबा म्हणाले, गेली ३५ वर्षे राजकारण करत असताना नेहमीच जिवाभावाचे सहकारी आणि कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून आपण काम केले आहे. प्रत्येकवेळी ज्येष्ठ सहकाऱ्यांचा सल्ला घेऊन कार्यकर्त्यांना विश्वासात व विचारात घेऊनच आपण आपली भूमिका घेतली आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीतही सांगोला शहर परिसरातील प्रभागनिहाय इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करू आणि कार्यकर्ते ज्या पद्धतीने निर्णय घेतील त्याप्रमाणे त्यांच्या भावनेचा आदर करूनच सांगोला नगरपालिका निवडणुकीत कोणत्या पक्षासोबत किंवा नेत्यासोबत युती आघाडी करायची याचा निर्णय घेऊ असेही शेवटी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नमूद केले.



