स्थानिक स्वराज आणि मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आयोगाला भेट देऊन पारदर्शक निवडणुकीची मागणी केली. “मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी का?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
Raj Thackeray on Election Commission: आगामी स्थानिक स्वराज संस्था तसेच मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Election 2025) महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून (Mahavikas Aghadi Delegation) सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाची भेट घेऊन प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली. मतदारयादी कशासाठी लपवताय? मतदार नोंदणी (Voter Registration Maharashtra) बंद करून ही लपवाछपवी का करताय अशी विचारणा राज यांनी केली. यावेळी काही प्रश्नांची उत्तरे देताना आयोगाची अधिकारी निरुत्तर झाल्याचे दिसून आले. राज ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात गेल्या आठ टर्मपासून 80 ते 90 हजार मतांनी निवडणूक जिंकत असताना यंदा लाखाने कसे पडले? हे कसे शक्य असल्याचे विचारताच आयोगाच्या अधिकारी निरुत्तर झाल्याचे दिसून आले. आयोगाला भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, रईस शेख, अनिल परब, अनिल देसाई, अजित नवले उपस्थित होते. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडाव्यात अशी मागणी करण्यात आली.
आमचं तुमचं करत बसू नका
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी आयोगाला चांगलं सुनावलं. ते म्हणाले की आमचं तुमचं करत बसू नका आमच्यासाठी निवडणूक आहे एकच आहे. जोपर्यंत राजकीय पक्षांचे एकमत होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका, अशी मागणी त्यांनी केली. सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही, असे म्हणत त्यांनी आयोगाला टोला लगावला. मतदान नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी करत आहात? निवडणुका राजकीय पक्ष लढवतात, तर राजकीय पक्षांना शेवटची मतदारयादी का दाखवली जात नाही? अशी विचारणा त्यांनी केली.
संबंधित बातम्या





डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका
दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आयोगाची झाडाझडती घेतली. जर त्रुटींसह निवडणुका घ्यायच्या असतील तर निवडणुका घ्यायच्या कशाला डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. चोक्कलिंगम म्हणाले, काही जबाबदारी आमच्याकडे नाही म्हणते, राज्य निवडणूक आयुक्त आमच्याकडे काही जबाबदारी आमच्याकडे नाही म्हणते, मग आम्ही कोणाशी बोलू? अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा आयोगाला सवाल केले. ते म्हणाले की आम्ही विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्या त्रुटी सांगितल्या होत्या त्यावर काम झालेलं नाही आता स्थानिक स्वराज्य निवडणुका होत आहेत, त्याबाबतही अनेक तक्रारी असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.