आशिया कप 2025 च्या फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवविरुद्ध पीसीबीने दाखल केलेल्या तक्रारीवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मॅच रेफरीने काय निर्णय घेतला, भारताचा कॅप्टन फायनलमध्ये खेळणार की बाहेर बसणार ?
Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये रविवारी भारत वि. पाकिस्तान अंतिम सामनवा रंगणार आहे. मात्र त्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यावरील आरोपांची सुनावणी पूर्ण झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) तक्रारीनंतर आयसीसीने ही प्रक्रिया सुरू केली. खरं तर, आशिया कप स्पर्धेत 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर, सूर्यकुमारने हा सामना ऑपरेशन सिंदूरचा भाग असलेल्या भारतीय सशस्त्र दलांना आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना समर्पित केला होता, ज्यामुळे पीसीबीने त्यावर आक्षेप घेत ते “राजकीय विधान” म्हटले होते. त्याबद्दल तक्रारही केली होती.
अखेर याप्रकरणावर आता सुनावणी झाली आहे. याबद्दलचे संपूर्ण प्रकरण ऐकल्यानंतर, सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी सूर्यकुमार यादव याला त्याच्या विधानाबद्दल अधिकृत इशारा दिला आहे. या सुनावणीसाठी भारतीय कर्णधारासह बीसीसीआयचे सीओओ हेमांग अमीन आणि क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजर सुमित मल्लापूरकर देखील उपस्थित होते. सूर्यकुमारच्या विधानामुळे खेळाच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो, परंतु तो गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही असे रिचर्डसनने बीसीसीआयला पाठवलेल्या ईमलेमध्ये नमूद केलं.
शिक्षा किती ?
आयसीसीच्या नियमांनुसार, ही घटना लेव्हल 1 चे उल्लंघन मानली जाते. या लेव्हलचे उल्लंघन केल्याबद्दल कोणत्याही खेळाडूवर बंदी घातली जात नाही. मात्र, त्या खेळाडूला मॅच फीवर दंड होऊ शकतो किंवा डिमेरिट पॉइंट्स मिळू शकतात. म्हणजेच आता चांगली बातमी अशी की, या कृतीमुळे सूर्यकुमारच्या अंतिम सामन्यात खेळण्याच्या शक्यतांवर कोणताही परिणाम होणार नाही.
फायनल खेळणार टीम इंडियाचा कर्णधार
संबंधित बातम्या





भारतीय संघाने आशिया कप 2025 च्या अंतिम फेरीत आधीच धडक मारली आहे. रविवारी, 28 सप्टेंबर रोजी दुबई येथे विजेतेपदासाठी फायनल सामना खेळला जाईल. आता अंतिम सामन्यात भारताचा पुन्हा एकदा पाकिस्तानशी सामना होईल. टीम इंडियासाठी दिलासादायक बाब म्हणजे, म्हणजे त्यांचा कर्णधार सूर्यकुमार यादव अंतिम सामन्यासाठी उपलब्ध असेल.
संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि कर्णधार सूर्यकुमार यादव उपलब्ध असल्याने संघाचा आत्मविश्वास आणखी वाढेल. या वादामुळे अंतिम सामन्यापूर्वी संघाचे लक्ष विचलित होण्याची भीती होती, मात्र आता हा निर्णय आल्यामुळे सूर्यकुमार यादव संघात असल्याने बीसीसीआयनेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता, सूर्या कोणत्याही निर्बंधांशिवाय मैदानावर असेल आणि टीम इंडिया जेतेपद जिंकण्यासाठी जीवतोड मेहनत करेल.