Baramati Crime : धावत्या एसटी मध्ये प्रवाशावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, आधी शेजारी बसलेल्यावर वार केला, नंतर आरोपीने स्वतःलाही…; बारामती हादरली

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Baramati Crime : बारामतीवरून इंदापूरला जात असलेल्या एसटी बसमध्ये एका प्रवाशावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

Baramati Crime : राज्यात मागील काही दिवसांपासून ‘कोयता गँग’च्या हल्ल्यांनी दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशाचप्रकारचा एक धक्कादायक प्रकार आता बारामती परिसरात घडला आहे. बारामतीवरून इंदापूरला जात असलेल्या एसटी बसमध्ये एका प्रवाशावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे, हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःवरही वार करण्याचा प्रयत्न केला. मात्,  काही प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत त्याला अडवले. या प्रकारामुळे बसमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आणि परिसरात खळबळ माजली आहे.

नेमकं काय घडलं?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर आगाराची ही एसटी बस बारामतीहून इंदापूरच्या दिशेने निघाली होती. बस जेव्हा काटेवाडी परिसरात पोहोचली, त्यावेळी मागच्या सीटवर बसलेल्या एका तरुणाने शेजारील प्रवाशावर अचानक कोयत्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, तो रक्तबंबाळ अवस्थेत बसमधून खाली उतरून निघून गेला.

आरोपीने स्वतःवर केला वार

हल्लेखोर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. त्याने त्या कोयत्याने स्वतःवर, विशेषतः गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र बसमधील काही जागरूक प्रवाशांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रोखले आणि त्याच्या हातून कोयता काढून घेतला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेतले.

हल्ल्यामागचे कारण स्पष्ट नाही

आतापर्यंतच्या प्राथमिक तपासात, हल्लेखोर आणि जखमी तरुण एकमेकांना पूर्वीपासून ओळखत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोघांमध्ये काहीतरी वैयक्तिक वाद असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.

पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

विशेष म्हणजे, जखमी तरुण कोयत्याच्या हल्ल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत बसमधून उतरून काटेवाडी परिसरात कुठेतरी निघून गेला आहे. तो नेमका कोण होता, याबाबतची माहिती अजूनही पोलिसांना मिळालेली नाही. त्याचा शोध घेण्याचे कामही सुरू आहे. हा प्रकार एसटी बसच्या शेवटच्या सीटवर घडल्याने इतर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. सकाळच्या वेळेस प्रवासी संख्या अधिक असल्याने बस खचाखच भरलेली होती. त्यामुळे हल्ल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon