उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. अंतर्गत गटबाजीमुळे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे भाऊ शिवाजी सावंत यांनी जिल्हा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. शिवाजी सावंत यांनी राजीनाम्यात आपली खंत व्यक्त केली आहे.
पंढरपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोलापुरात मोठा धक्का बसला आहे. कारण माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी आपल्या जिल्हा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिली आहे. शिवाजी सावंत हे शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत होते. पण त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तानाजी सावंत यांचे बंधू असणारे शिवाजी सावंत हे गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत नाराज होते. अखेर त्यांनी आज राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सोलापुरात शिवसेनेला मोठा फटका बसला आहे.
राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवाजी सावंत यांनी पदाचा राजीनामा देणं यामुळे सोलापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मानला जातोय. सोलापूर जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजीचा फटका थेट शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. काही दिवसांपूर्वी शिवाजी सावंत यांच्या कार्यक्रमाला ऐनवेळी एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली होती. त्यावेळपासूनच शिवाजी सावंत नाराज असल्याची चर्चा आहे. शिवाजी सावंत यांनी राजीनाम्यात आपली सविस्तर भूमिका मांडली आहे.
शिवाजी सावंत यांनी पत्रात काय म्हटलंय?
“मी शिवाजी जयवंत सावंत, शिवसेना संपर्कप्रमुख सोलापूर जिल्हा या पदाचा राजीनामा देत आहे. कारण जिल्हा संपर्कप्रमुख असूनदेखील मला विश्वासात न घेता, मला न सांगता जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर माझ्या तालुक्यातील तालुकाप्रमुख आणि शहर प्रमुख यांच्याही नियुक्त्या केल्या आहेत”, अशी खंत शिवाजी सावंत यांनी राजीनाम्याच्या पत्रात व्यक्त केली आहे.
“पक्षश्रेष्ठींचा विश्वास नसल्यामुळे मी या पदाचा राजीनामा सादर करत आहे. यापुढे मी बाळासाहेबांच्या विचारांचा आणि आनंद दिघे यांच्या सहवास लाभलेला शिवसैनिक म्हणून काम करणार आहे”, असंदेखील शिवाजी सावंत आपल्या राजीनाम्यात म्हणाले आहेत. दरम्यान, शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदे सावंत यांची पुन्हा मनधरणी करतात का? ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
सम्बंधित ख़बरें




