maharashtrapoliticaltop news

दादांचा साहेबांना धक्का, आमदार गळाला लावला; भाजप नेत्याला घाम फोडणाऱ्या नेत्याची घरवापसी

छत्रपती संभाजीनगर: राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. त्यानंतर आता पक्षात इनकमिंग सुरु झालं आहे. विधानसभा निवडणुकीआधी अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे गेलेल्या नेत्यांनी आता परतीचे दोर टाकण्यास सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार सतीश चव्हाण उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ते मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर सतीश चव्हाण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. विधानसभा निवडणूक लढवण्यास ते इच्छुक होते. त्यांना गंगापूर मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. पण महायुतीत ही जागा भाजपकडे जात असल्यानं चव्हाण यांची अडचण झाली. विधानसभा लढवण्यासाठी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली. पण आता ते अजित पवारांच्या पक्षात परतणार आहेत.

सतीश चव्हाणांनी शरद पवारांच्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांचा निसटता पराभव झाला. गेल्या तीन निवडणुका १५ हजारांहून अधिक मतांनी जिंकत आलेल्या भाजपच्या प्रशांत बंब यांना चव्हाणांनी यंदा चांगलाच घाम फोडला. चव्हाणांनी १ लाख २० हजार ५४० मतं घेतली. ते अवघ्या ५ हजार १४ मतांनी पराभूत झाले. आमदार चव्हाण यांच्या घरवापसीमुळे राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.

विधानसभा निवडणुकीआधी पक्ष सोडणाऱ्या सतीश चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं कारवाई केली होती. त्यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेलं होतं. पण प्रत्यक्षात ही कारवाई ६ महिनेदेखील टिकलेली नाही. विधानसभा निवडणूक निकालाला २ महिने पूर्ण होण्याआधीच चव्हाण स्वगृही परतणार आहेत. ते उद्या तुतारी खाली ठेवून घड्याळ हाती बांधतील.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ दिवसीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. शिर्डीमध्ये अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे. याच अधिवेशनात आमदार चव्हाण यांचा पक्षप्रवेश होईल. चव्हाण यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीला मराठवाड्यात बळ मिळणार आहे. गंगापुरात त्यांची चांगली ताकद आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत एकदाही जिंकता आलेला नाही.

Related Articles

Back to top button