अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला; धारदार पातं पाठीत रुतून राहिलं
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल आलं आहे. सैफ अली खानला चाकू हल्ल्यात गंभीर जखमा झाल्याची माहिती आहे. घरात घुसलेल्या अज्ञात हल्लेखोराने सैफवर जीवघेणा हल्ला केला. यामुळे तो जखमी झाल्याने त्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सैफ अली खानच्या मानेवर धारदार शस्त्राची 10 सेमी जखम आहे. याशिवाय हातावर जखम आहे आणि त्याच्या पाठीत काही धारदार वस्तू घुसवण्यात आली होती, जी बुधवारी रात्री शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आली.
अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चाकू हल्ल्यात सैफ अली खानच्या मानेजवळ 10 सेमीची मोठी जखम झाल्याची माहिती आहे. याशिवाय त्याच्या हातावर आणि पाठीवर अनेक वार करण्यात आले. हल्लेखोराने सैफच्या पाठीत धारदार शस्त्राने वार करण्यात केला. हे धारदार शस्त्र सैफच्या पाठीत अडकलं होतं. यामुळे त्याला खूप रक्तस्त्राव झाल्याने मध्यरात्री त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तातडीनं शस्त्रक्रिया करुन पाठीत अडकलेलं हे धारदार शस्त्र काढण्यात आलं.
अभिनेता सैफ अली खानच्या टीमकडून याबाबत अधिकृत निवेदन जारी करत सांगण्यात आलं आहे की, ‘सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. सध्या तो रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. यासंदर्भात पोलिसांकडून तपास सुरु आहे. आम्ही तुम्हाला परिस्थितीबद्दल अपडेट देत राहू.’
नेमकं प्रकरण काय?
मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास सैफ अली खानवर हल्ला झाला. यावेळी घरात सैफ अली खानसोबत, करीना कपूर, मुले आणि कर्मचारी होती. मध्यरात्री चोरीच्या प्रयत्नासाठी घुसलेल्या चोराने मुलांच्या रुममध्ये घुसखोरी केली. यानंतर घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केला. यावेळी सैफ अली खानने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात चोराने त्याच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शस्रक्रिया झाल्यानंतर सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.