21 एप्रिल ते 11 मे दरम्यान केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त दलांनी 21 दिवस चाललेल्या कारवाईत 1.72 कोटी रुपयांचे बक्षिस असलेल्या 31 नक्षलवाद्यांना ठार मारलंय. नक्षलवाद्यांचा कणा मोडण्यासाठी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट राबविण्यात आलं.
छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील अबुझदमदच्या जंगली भागात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू असून यात वीसहून अधिक माओवादी मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. अबुझमदमधील एका विशिष्ट भागात एक वरिष्ठ माओवादी नेता लपल्याची माहिती मिळाल्यानंतर नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंडागाव या चार जिल्ह्यांमधून जिल्हा राखीव रक्षकांनी (DRG) ही कारवाई केली. अबुझदमदचा मोठा भाग नारायणपूरमध्ये असून त्याचा काही भाग विजापूर, दंतेवाडा, कांकेर आणि महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातही पसरलेला आहे. छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेगुट्टालू टेकड्यांमध्ये आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा दलांनी ‘ब्लॅक फॉरेस्ट’ या नावाने नक्षलविरोधी मोठी मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.












