विरारमध्ये सापडलेल्या एका महिलेच्या निर्दयीपणे हत्या केलेल्या मुंडक्याच्या प्रकरणात पोलिसांना यश मिळाले आहे. होळीच्या दिवशी सापडलेल्या मुंडक्याचा तपास करून पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपी पतीला अटक केली आहे.
विरारमध्ये महिलेची निर्घृणपणे हत्या करून, तिचे मुंडके वेगळे करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्या महिलेचे वेगळे केलेले मुंडके होळीच्या दिवशी विरार मांडवी हद्दीत एका प्रवासी बॅगमध्ये सापडले होते. या हत्येचा मांडवी पोलीस आणि गुन्हे शाखा कक्ष 3 चे पथक समांतर तपास करत होते. अवघ्या 24 तासात पोलिसांना या हत्येचा उलगडा करण्यात यश आले आहे. कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची हत्या केली असल्याचे उघड झाले असून याप्रकरणी पतीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
कौटुंबिक वादातून हत्या
हरीश बरवराज हिप्परगी ( वय 49) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. तर उत्पला हरीश हिप्परगी ( वय 51) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. ही महिला पश्चिम बंगालची राहणारी असून, आरोपी पती हा कर्नाटकचा राहणारा आहे. एका हॉटेलमध्ये काम करत असताना या दोघांची ओळख झाली. त्यानंतर 12 वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. मयत महिलेचा हा दुसरा पती असून, या दोघांना एक मुलगाही आहे. हे दोघे प्रेमविवाहनंतर नालासोपारा पूर्व रहेमत नगर येथे रूम भाड्याने घेऊन राहत होते. लग्नानंतर या दोघांमध्ये कौटुंबिक वादातून वारंवार वादविवाद होत होते.
नेमकं काय घडलं?
होळीच्या दिवशी म्हणजे 13 मार्च रोजी मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विरार फाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिरकुंडा दर्ग्या जवळ सडलेल्या अवस्थेत एका प्रवासी बॅग आढळली होती. या बॅगेत महिलेची धड नसलेली मुंडी सापडली होती. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर मांडवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यात त्यांना तिथे एक डायरी सापडली होती. त्यात काही नंबर मिळाले होते. त्यावरून महिलेची ओळख पाठविण्यात महिलेला यश आले.
याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष 3 चे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांनी ही या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता. याचवेळी घटनास्थळावर या टीमला एका ज्वेलरी शॉपचे पाकीट मिळाले होते. यावरून या पाकीटचा तपास केला असता, त्या मृत महिलेची माहिती मिळाली. यात पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली ऍक्टिव्हा मिळाली. त्याच ऍक्टिव्हाचा धागा पकडून पोलीस पत्त्यावर पोहचले. त्यावेळी आरोपी त्याच्या घरात आढळून आला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. कौटुंबिक कारणावरून ही हत्या केली असल्याचे आरोपीने पोलीस तपासात सांगितले आहे.
हे सुद्धा वाचा
उन्हाळ्यात आरोग्यासाठी दही की योगर्ट अधिक फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला