Kolhapur Driver Heart Attack: गाडी चालवत असताना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात चालकाने गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडीने रस्त्याशेजारी उभ्या वाहनांना जोरदार धडक दिली.
कोल्हापूर: जिल्ह्यातील टेंबलाई नाका चौकातून टाकाळा मार्गे राजारामपुरीकडे जाणार्या उड्डाणपुलाजवळ भरधाव चारचाकीने रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या दुचाकी, रिक्षांसह नऊ वाहनांना उडवल्याने भीषण अपघात घडले होते. ही घटना शुक्रवारी (१४ मार्च) मध्यरात्री घडली होती. या भीषण दुर्घटनेत राजारामपुरी येथील उद्योजक धीरज शिवाजीराव पाटील (वय ५५, रा.राजारामपुरी, पाचवी गल्ली) यांचा मृत्यू झाला होता. गाडी चालवत असतानाच धीरज पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि हा अपघात घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कोल्हापूर शहरातील टेंबलाई नाका चौकातून टाकाळा मार्गे राजारामपुरीकडे जाणार्या उड्डाणपुलाजवळ शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास धीरज शिवाजीराव पाटील हे आपल्या चारचाकीतून जात होते. ते ताराबाई पार्क परिसरातील हॉटेलमध्ये जेवण करून मध्यरात्री दोनच्या सुमारास टेंबलाई नाका, टाकाळामार्गे राजारामपुरी येथील आपल्या निवासस्थानाकडे कारने जात होते. यावेळी अचानक त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव वेगात असलेली त्यांची कार उड्डाणपुलाजवळ रस्त्याच्या एका बाजूला रिक्षा, मोपेड, दुचाकीसह ८ ते ९ वाहनांना जोरदार धडकली. त्यानंतर ही गाडी पुढे जाऊन रस्त्यावर कचरा कोंडाळ्याजवळ जाऊन थांबली.
मध्यरात्र असल्याने या अपघातवेळी मोठा आवाज देखील झाला. यामुळे परिसरातील नागरिक घरातून बाहेर पडले. यावेळी रस्त्यावर सर्वत्र रिक्षा आणि दुचाकीच्या तुटलेल्या अवशेषांचा खच पडला होता. शिवाय, एक चार चाकी पुढे जाऊन आदळलेली दिसून आली. दरम्यान, नागरिकांनी तात्काळ पोलिसांंशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक निरीक्षक दत्तात्रय भोजणे यांच्यासह राजारामपुरी व शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह शाहूपुरी पोलिसांची गस्ती पथके घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मदतीने स्थानिक नागरिकांनी धीरज पाटील यांना तत्काळ रुग्णालयात हलविले. मात्र, तिथे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल झाला असून या व्हिडिओतून अपघाताची भीषणता दिसून येत आहे.
हेही वाचा
मोठी बातमी, विधान परिषदेसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची नाव जाहीर