: लाडक्या कॉन्ट्र्रक्टरसाठी मुंबईत अनेक कामं काढली असून हा अर्थसंकल्प त्यांनी खाल्ला आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
मुंबई : ‘मारल्या थापा भारी, केला महाराष्ट्र कर्जबाजारी’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली. गेल्या 10 वर्षातला सर्वात बोगस अर्थसंकल्प असून लाडक्या कान्ट्रॅक्टरसाठीचा हा अर्थसंकल्प असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. लाडक्या बहिणींना मिळणारी रक्कम 2100 केली नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. आता निवडणुकीपूर्वी ज्या जाहिराती केल्या त्या पिजन होल मध्ये टाकायच्या का? या जाहीरातीचा करायचं काय? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी आणि लाडक्या बहिणींची राज्य सरकारने मोठी फसवणूक केल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली.
लाडका कान्ट्रॅक्टर योजना
लाडकी बहीण नाही तर लाडका कॉन्ट्रॅक्टर ही त्यांची योजना आहे. त्यांनी हा अर्थसंकल्प खाल्ला आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ते म्हणाले की, “आचार्य अत्रे यांची आठवण आता आली. ते म्हणाले असते, मागील 10 हजार वर्षात इतका बोगस अर्थसंकल्प पाहिला नाही. लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळाले का? शेतकऱ्यांची कर्जमाफी केली का? मी जशी कर्जमाफी केली होती ती तुम्ही करणार का? असा विचारलं होतं. पण ती फडणवीस यांनी त्यावर काहीही केलं नाही. ते म्हणाले होते की मी कामांना स्थगिती द्यायला उद्धव ठाकरे आहे का? तुम्ही उद्धव ठाकरे होऊ शकत नाही मी काल सुद्धा म्हणालो होतो.”
निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणांचं काय?
निवडणुकीपूर्वी ज्या 10 घोषणा केल्या होत्या त्यातल्या किती घोषणा पूर्ण केल्या? कॉन्ट्रॅक्टरसाठी खूप काही आहे या अर्थसंकल्पात. 64 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मुंबईत आहे. दोन विमानतळ जोडण्याचे काम अदानीने केलं पाहिजे, हे सरकारने करायला नको असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांच्या थकबाकी वीज बिलाचं काय? त्याचं काय करणार आहात तुम्ही? हा विकास नाही तर महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. सगळ्या योजना या गडबड घोटाळ्याच्या योजना आहेत. आवास योजना नाही ही आभास योजना आहे असंही ते म्हणाले.
तुम्ही सरकारच्या बगलबच्च्यांच्या कारखान्यांना 1100 कोटीची थकहमी देता. मग मुंबई महापालिकेच्या थकित पैसे राज्य सरकार का देत नाही? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.
ही बातमी वाचा :
अख्खा उसाचा ट्रक अंगावर पलटला, चार कामगार जागीच ठार