सोलापूर, 7 मार्च (हिं.स.)।
पाच वर्षांतील सरासरीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील जानेवारी महिन्यातील भूजल पातळीत सरासरी ०.७६ मीटरने वाढ आढळली आहे. तरीही उपलब्ध भूजल साठ्याचा काळजीपूर्वक वापर न केल्यास एप्रिल – मे महिन्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात १५९ निरीक्षण विहिरी आहेत. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने जानेवारी महिन्यात या निरीक्षण विहिरींतील पाणीपातळी नोंदवली आहे. त्यानुसार पाच वर्षांतील सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत यंदा भूजल पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्याची पाच वर्षांतील भूजल पातळीची सरासरी एकूण ५.७८ मीटर आहे. यंदा एकूण ती ५.०१ मीटरने वाढली आहे. एकंदरीत पाच वर्षांच्या तुलनेत यंदा ०.७६ मीटरने वाढली आहे.
जिल्ह्यात गतवर्षी २०२४ मध्ये जून ते डिसेंबर या कालावधीत एकूण ६०५.२ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या १०७.५ टक्के पाऊस पडला. जिल्ह्यात अनेक मध्यम प्रकल्प, तलाव व कालवे असूनही पडलेल्या पावसाच्या तुलनेत जानेवारीतील भूजल पातळीची स्थिती अपेक्षित नाही. ती पाच वर्षातील सरासरीच्या तुलनेत ०.७६ मीटर म्हणजे २.४० फुटाने वाढली असली तरी वाढते ऊन व पाण्याचा उपसा पाहता ती लवकर खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एप्रिल – मे महिन्यात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
हे सुद्धा वाचा
साेलापूर जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी ०.७६ मीटरने वाढ