crimemaharashtrasolapurtop news

शेतात काम करणार्‍या महिलेवर तरस वन्य प्राण्याचा हल्ला

सांगोला (प्रतिनिधी):- शेतात काम करणार्‍या 45 वर्षीय महिलेवर तरस वन्यप्राण्यांने हल्ला केला असल्याची घटना सांगोला तालुक्यातील कोळ्यामध्ये म्हसोबा मंदिरा जवळ काल दुपारच्या सुमारास घडली. शोभा सुखदेव कोळेकर (वय 45) रा.कोळेकर वस्ती, कोळा असे जखमी महिलेचे नाव आहे. कोळा येथे प्राथमिक उपचार करुन त्यांना मिरज येथे हलविण्यात आले आहे. वन्य प्राण्याकडून होत असलेल्या हल्ल्याचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने वन विभागाकडून कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील नागरिकातून होत आहे.

याबाबत वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, फॉरेस्ट शेजारीच असणार्‍या म्हसोबा मंदिराजवळ शोभा सुखदेव कोळेकर या शेतात बाजरी काढत होत्या. त्याचवेळी अचानक पाठीमागून तरस आला. त्यावेळी तरस आपल्यावर हल्ला करेल या भितीने तरसाला ढकलून देण्याचा प्रयत्न महिलेने केला. त्यामुळे तरसाने महिलेवर हल्ला करत डाव्या हाताला व उजव्या हाताला चावा घेतला व पुन्हा फॉरेस्ट मधून पळून गेला. तरस वन्यप्राण्यांने हल्ला केल्यामुळे महिलेच्या डाव्या हाताला 4 टाके, उजव्या हाताला 10 टाके घेण्यात आले आहेत. यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी केला आहे.  

घटनेनंतर सदर महिलेवर तत्परतेने कोळा येथील खाजगी दवाखान्यात उपचार केले. खाजगी दवाखान्यात रॅबीट नस नसल्यामुळे त्त्यांना पुढील उपचारासाठी मिरज येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी दिली.

Related Articles

Back to top button