Friday, October 18, 2024
Homemaharashtraमाजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा आज ठाकरे गटात प्रवेश

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा आज ठाकरे गटात प्रवेश

 

सांगोला – ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी महायुतीला पुन्हा धक्का दिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडलेले माजी आमदार दीपकआबा साळुंखे आज शुक्रवारी (दि.18) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ते हातात मशाल घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी (दि.18) दुपारी 3 वाजता हा पक्षप्रवेश मातोश्री येथे पार पडेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अजित पवारांची साथ सोडलेली सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचा आज दुपारी तीन वाजता प्रवेश होणार आहे. त्यामुळे आता सांगोल्यात महाविकास आघाडीचे गणित बिघडणार आहे. सांगोला हा पारंपारिक शेतकरी पक्षाचा बालेकिल्ला असून आता उद्धव ठाकरे गटाने या जागेवर हक्क सांगत दीपकआबा साळुंखे यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. जर महाविकास आघाडीने अन्याय केला तर आम्ही सांगोल्यात लाल बावटा फडकाऊ, असा इशारा शेकापच्या अनिकेत देशमुख यांनी दिला आहे.

शिवसेनेचे स्टार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात आता त्यांचेच गेल्या वेळचे सहकारी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली होती. दीपकआबा साळुंखे पाटील हे अजित पवार यांची साथ सोडून आता उद्धव ठाकरे यांची मशाल हातात धरणार आहेत. आज मातोश्री येथे दुपारी तीन वाजता दीपकआबा साळुंखे पाटील यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होत असून यासाठी सांगोल्यातून 500 पेक्षा जास्त गाड्या घेऊन साळुंखे- पाटील यांचे समर्थक मुंबईकडे रवाना झाले आहेत. आता सांगोल्यामध्ये शहाजी बापूंच्या विरोधात दीपकआबा साळुंखे अशी लढत दिसण्याची शक्यता असून शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढाई रंगतदार असणार आहे.

 

या घडामोडीमुळे महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होत असून गेले साठ वर्षापेक्षा जास्त काळ शेकापचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या सांगोला विधानसभा मतदारसंघात यावेळी उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीकडून रिंगणात उतरणार असल्याचे चित्र दिसत आहे. याच मतदारसंघातून स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी तब्बल 55 वर्ष विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत दीपकआबा साळुंखे यांना तिकीट डावल्याने त्यांनी ऐनवेळी महायुतीचे शहाजीबापू पाटील यांचा प्रचार केला होता. या निवडणुकीत शहाजीबापू हे केवळ 768 मतांनी विजयी झाले होते. आता दीपकआबा साळुंखे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष काय भूमिका घेणार याकडे लक्ष असणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments