* मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर
नवी दिल्ली , 16 फेब्रुवारी (हिं.स.)।
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर महाकुंभसाठी प्रयागराजकडे जाणाऱ्या दोन एक्स्प्रेस उशिराने आल्या. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर गर्दी उसळल्याने स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली असून या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ३ लहान मुलांचा समावेश आहे. घटनेमध्ये अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून प्रयागराजकडे महाकुंभसाठी जाण्यासाठी रेल्वे सुरू आहे. शनिवारी(१५ फेब्रुवारी) रात्री उशिरा प्रयागराजकडे जाणाऱ्या दोन गाड्या उशिराने आल्या. त्यामुळे स्टेशनवर भाविकांची तुफान गर्दी झाली होती. दरम्यान, अचानक प्लॅटफॉर्म बदलण्याची घोषणा झाल्याने लोक एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर धावू लागले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या दुर्दैवी घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमी भाविकांना तातडीने नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.फलाटापेक्षा पुलावर गर्दी जास्त असल्याने चेंगराचेंगरी झाल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनी शोक व्यक्त केला आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आभा देवी(वय 79), पिंकी देवी(वय 41), शीला देवी(वय 50), व्योम(वय 25), पूनम देवी(वय 40), ललिता देवी(वय 35), सुरुची(वय 11), कृष्णा देवी( वय 40), विजय साहा( वय 15 ), नीरज( वय 12), शांती देवी(वय 40), पूजा कुमार(वय 8) , संगीता मलिक( वय 34) , पूनम(वय 34), ममता झा(वय 40), रिया सिंग(वय 7), बेबी कुमारी( वय 24) आणि मनोज(वय 47) यांचा समावेश आहे..
या चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.