मुंबई, पुणेमार्गे सोलापूरला धावणार वंदे भारत सुपरफास्ट ट्रेन
मुंबई ते सोलापूर व्हाया पुणे ‘वंदे भारत’ एक्सप्रेस ट्रेनला १० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्टेशनहून सुटेल.
ही गाडी मुंबई, पुणे आणि शिर्डीमार्गे सोलापूरकडे रवाना होईल. मुंबई ते पुणे हे अंतर केवळ १ तास ५० मिनिटात पूर्ण केले जाईल. ही या दोन शहरांदरम्यान धावणारी पहिली वंदे भारत ट्रेन असेल. या नव्या ट्रेनबाबत लवकरच मध्य रेल्वे (सीआर) कडून अधिकृत घोषणा केली जाईल. मोदी १० फेब्रुवारी रोजी दाऊदी बोहरा समाजाच्या अरबी अकादमी उद्घाटन समारंभासाठी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते सीएसएमटी स्टेशनमध्ये नव्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार ही ट्रेन सीएसएमटीहून सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि रात्री १०.४० वाजता सोलापूर स्टेशनवर दाखल होईल. दुसऱ्या दिवशी सोलापुरातून सकाळी ६.०५ वाजता रवाना होईल व दुपारी १२.१० वाजता मुंबईत पोहोचेल.