maharashtra
अहो, आगलावे बोम्मई; मिटवायचे की पेटवायचे?
गेल्या 30 हून अधिक वर्षांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद जैसे थेच आहे. यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यातील गावांवर आपला हक्क सांगितला. ज्यामुळे दोन्ही राज्यात सीमावादावरून वादळ आले आहे.
हे प्रकरण कोर्टात तर गेलेच पण महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनातही हा मुद्दा गाजला. यावेळी विरोधकांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर एकमताने ठराव मांडण्याची मागणी करत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर देण्याची मागणी केली आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेनेचे मुखपत्र सामना अग्रलेखातूनही महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर भाष्य करण्यात आलं आहे.
यात बोम्मईंना खरमरीत सवालही करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत थातूरमातूर विषयांवर खोके सरकार नंगानाच करीत आहे आणि तिकडे कर्नाटक सरकारने महाराष्ट्राविरोधात निषेधाचाच ठराव मंजूर करून चपराक लावली आहे, हे समजत नसेल तर निर्लज्जपणाची हद्दच झाली ! बोम्मई यांनी एक सांगावे, त्यांना हा वाद मिटवायचा आहे की पेटवायचा आहे ? त्यावर महाराष्ट्र आपली भूमिका ठरवेल!, अशा शब्दात शिवसेनेने बोम्मईंनाच खरमरीत सवाल केला आहे.