sports
शाब्बास रे पठ्ठया! ईशानचा डबल धमाका : दहा षटकार, चोवीस चौकारांसह 210 धावांची तुफानी खेळी
भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना चितगाव येथे सुरू आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशसमोर ४१० धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
भारताकडून इशान किशनने द्विशतक झळकावले. त्याचवेळी विराट कोहलीने शतकी खेळी खेळली. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय बांगलादेशी गोलंदाजांनी योग्य ठरवला आणि सलामीवीर शिखर धवनला स्वस्तात तंबूत पाठवले. धवनला केवळ ३ धावा करता आल्या. पण त्यानंतर कोहली आणि इशान यांनी बांगलादेशी गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली.
एका टप्प्यावर भारत ४५० पेक्षा जास्त धावा करेल असे वाटत होते, परंतु हे दोन्ही फलंदाज ६ षटकांच्या अंतराने बाद झाले आणि इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. यामुळे टीम इंडियाला अखेरपर्यंत ८ गडी गमावून केवळ ४०९ धावांवरच समाधान मानावे लागले.
विराटने ९१ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या साह्याने ११३ धावा केल्या तर इशानने १३१ चेंडूत २४ चौकार आणि १० षटकारांचा पाऊस पाडला. बांगलादेशकडून तस्कीन अहमद, एबाबत हुसेन आणि शकिब अल हसन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.