शिंदे गटाचे पुन्हा ‘चलो गुवाहटी’
शिंदे यांनी शिवसेनेतल्या ४० आमदारांसह बंड करत राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. तीन महिन्यांपूर्वी शिंदे गटाचे आमदार सूरतमार्गे गुवाहाटीला रवाना झाले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे हे ४० आमदारांसह पुन्हा गुवाहाटीचा दौरा करणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाचे सर्व आमदार पुढच्या आठवड्यात गुवाहाटीला जाण्याची शक्यता आहे. कारण याबाबत गुवाहाटीतील स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी शिंदे गटाचे काही नेते गुवाहाटीला गेल्याची माहिती आहे.
पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व समर्थक आमदारांसह गुवाहाटीला जाणार आहे. या दौऱ्यात ते कामाख्या देवीचं दर्शन घेणार असून ज्या लोकांनी अथवा नेत्यांनी शिंदे गटाला बंडावेळी गुवाहाटीत मदत केली होती, त्यांचं शिंदे आभार मानतील. त्यात आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा, आसामचे राज्यपाल, गुवाहाटीचे पोलीस अधिक्षक आणि इतर नेत्यांची शिंदे भेट घेण्याची शक्यता आहे.