कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलिसांबाबत गंभीर आरोप केले आहेत. दिल्ली पोलीस कोणत्याही क्षणी आपल्याला ताब्यात घेऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच इंटेलिजन्स ब्युरो (IB) आणि दिल्ली पोलीस आपल्यावर लक्ष ठेवून असल्याचा आरोपही दिपके यांनी केला.
दिपके यांच्या म्हणण्यानुसार, ते सध्या राहत असलेल्या ठिकाणाच्या परिसरात पोलीस आणि आयबीचे अधिकारी फिरताना दिसत आहेत. तसेच काही दुचाकींना नंबर प्लेट नसल्याचेही त्यांनी सांगितले. संबंधित व्यक्ती परिसरातील वॉचमनकडून माहिती घेत असल्याचा दावाही त्यांनी केला.
कॉकरोच जनता पार्टीकडून दिल्लीतील कनॉट प्लेस येथे तिरंगा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या मोर्चाला न्यायालयाकडून परवानगी नाकारण्यात आल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
यापूर्वी १० ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर दिपके यांनी पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले होते.
तिरंगा फडकवण्यासाठी आंदोलन करताना अटक होण्याची शक्यता असली, तरी आपण घाबरणार नसल्याचे दिपके यांनी म्हटले आहे. त्यांच्या या आरोपांवरून दिल्लीतील आगामी आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





