मुंबईतील नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांना मरीन ड्राइव्ह परिसरात पोलिसांनी काही काळ ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे. दिपके हे समर्थकांसह फलक घेऊन मरीन ड्राइव्ह परिसरात दिसल्यानंतर पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका महिला पोलिस अधिकाऱ्यासह पोलिसांचे पथक दिपके यांच्याजवळ गेले. त्यानंतर त्यांना पोलीस वाहनातून मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले. काही वेळानंतर दिपके यांना सोडण्यात आले.
मात्र, मुंबई पोलिसांनी दिपके यांना औपचारिकरित्या ताब्यात घेतल्याचे नाकारले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ते मरीन ड्राइव्ह परिसरात लोकांशी संवाद साधत होते आणि पोलिसांकडे काही प्रश्न विचारत होते. दुसरीकडे, दिपके यांनी वेगळी माहिती दिली असून, एका महिला अधिकाऱ्याने त्यांना चहासाठी सोबत येण्यास सांगितल्यानंतर पोलीस ठाण्यात नेल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, CJPने २ ऑक्टोबर रोजी मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. शिवाजी पार्क येथे आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर दिपके यांनी ‘जेल भरो आंदोलन’ करण्याची भूमिका जाहीर केली होती. या आंदोलनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
मरीन ड्राइव्हवरील दिपके यांना पोलिसांनी नेल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर या घटनेची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.









