टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Nashik Rain: नाशिकमध्ये जोर’धार’, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी

Nashik Rain: पावसाच्या संततधारेमुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली असून रामकुंड परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Nashik Rain: नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाच्या संततधारेमुळे गोदावरी नदीच्या (Godavari River) पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली असून रामकुंड (Ramkund) परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदाघाटावरील दुतोंड्या मारुतीच्या (Dutondya Maruti) कमरेपर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून परिसरातील अनेक लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने गोदाघाट परिसरातील टपऱ्या आणि दुकाने सुरक्षित स्थळी हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Nashik Rain: धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस; विसर्ग वाढवला

नाशिक शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून (Gangapur Dam) 3,165 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग (Water Discharge) सुरू असून पाऊस वाढल्यास टप्प्याटप्प्याने तो आणखी वाढवण्यात येणार आहे.

इतर धरणांमधूनही मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे.

दारणा धरण: 2,648 क्यूसेक

पालखेड धरण: 10,332 क्यूसेक

नांदूर मध्यमेश्वर धरण (जायकवाडीच्या दिशेने): 13,407 क्यूसेक

याशिवाय कडवा, भावली आणि पुनेगाव धरणांमधूनही विसर्ग सुरू आहे. गोदावरी आणि दारणा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Nashik Rain: रात्रभर मंदिरात अडकलेल्या नेपाळी पर्यटकाची सुरक्षित सुटका

पावसाचा आणि पाण्याचा अंदाज न आल्याने नदीकाठावरील एका मंदिरात एक पर्यटक अडकून पडला होता. रात्री अचानक पाण्याची पातळी वाढल्याने त्याला बाहेर पडता आले नाही आणि त्याने संपूर्ण रात्र पाण्यातच काढली. सकाळी स्थानिक नागरिक, अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती मिळताच जीव रक्षक दलाच्या जवानांनी तातडीने बचाव मोहीम राबवून त्याला सुखरूप बाहेर काढले. हा नागरिक नेपाळचा रहिवासी असून गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.

Nashik Rain: त्र्यंबकेश्वरमध्ये सोसाट्याचा वारा; पत्रे उडून 3 भाविक जखमी

ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) परिसरात रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आलेल्या आठ भाविकांचा समूह रस्त्याने जात असताना एका घराचे पत्रे वाऱ्यामुळे उडून त्यांच्यावर पडले. या दुर्घटनेत 3 भाविक जखमी झाले असून, यवतमाळ येथील अमित आढे हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमित आढे यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्र्यंबकेश्वर परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना 24 तास सतर्क राहून खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now