Omraje Nimbalkar Operation Tiger: दहा वर्षापासून मकरंद राजे खासदार ओमराजे निंबाळकरांसोबत एकत्र राजकारणात, धाराशिव नगर परिषदेत नगराध्यक्ष पदही भूषवलेले, आता ठाकरेंच्या सेनेचे सहसंपर्कप्रमुख

Omraje Nimbalkar Operation Tiger: खासदार ओमराजे निंबळकरांच्या बंडाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ओमराजे निंबाळकर यांचे महिनाभरापासून बंडाचे प्लॅनिंग सुरू होते, पक्षांतराबाबत चर्चा झाली होती, मात्र तो निर्णय मला मान्य नव्हता, असा थेट दावा त्यांचे चुलत बंधू मकरंद राजेंनी केला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या पक्षांतराच्या निर्णयाला आता घरातूनच विरोध झाल्याचं चित्र आहे. स्वतःचे बंधू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांनी ओमराजेंच्या निर्णयापासून स्पष्टपणे फारकत घेत ठाकरेंसोबतच राहणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ओमराजेंच्या नव्या राजकीय वाटचालीला पहिला मोठा धक्का घरातूनच बसल्याची चर्चा रंगली आहे. मकरंदराजे निंबाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख आहेत. (Maharashtra Politics news)
दहा वर्षे एकत्र राजकारण करणारे दोन भाऊ आता वेगवेगळ्या राजकीय वाटांवर उभे ठाकल्याचे चित्र दिसत आहे. एवढंच नाही तर पक्षाचा आदेश मिळाला तर ओमराजेंच्या विरोधात रस्त्यावर उतरायलाही तयार असल्याचा इशारा मकरंद राजेंनी दिला आहे. ओमराजे यांनी पक्षांतराबाबत माझ्यासोबत चर्चा केली. मात्र मला निर्णय पटला नाही , त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. मी समजूनही सांगण्याचा प्रयत्न केला. 2029 ला ही आपण सहज निवडून येऊ, असे सांगितलं, पण त्यांनी ऐकले नाही. व्यवस्थेला जाब विचारून काम करून घेणे ही शिवसेनेकडून अपेक्षा असते, यापुढे काम तसं होईल. पक्षाने आदेश दिला आणि गरज पडली तर ओमराजेंच्या विरोधात रस्त्यावरही उतरण्याची तयारी असल्याचेही मकरंदराजे निंबाळकर यांनी म्हटले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्याची तयारी सुरू झाली असून संघटनात्मक बांधणीवर भर देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ओमराजेंनी पक्ष सोडला तरी शिवसैनिकांची गर्दी आणि ताकद कायम ठाकरेंसोबतच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. धाराशिवच्या राजकारणात आता लढाई भावाविरुद्ध भाऊ अशी पहायला मिळणार आहे.
Archana Patil: अर्चना पाटलांचा ओमराजे निंबाळकरांना टोला
कट्टर राजकीय विरोधक पाटील कुटुंबाकडून ओमराजेंचे महायुतीत स्वागत केले आहे. युतीने उमेदवारी दिल्यास प्रचारही करू, असे सांगत जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटीलांकडून खासदार ओमराजे निंबाळकर यांचे स्वागत करण्यात आले. छोटे छोटे जॅक टॉमी , बसमध्ये सीट मिळवून देणे हा विकास नसतो असा चिमटा अर्चना पाटील यांनी काढला; लोक भावनिक झाले म्हणून लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याची सल त्यांनी बोलून दाखवली. आता विकासासाठी ते महायुतीत आले असतील तर त्यांना आमचं सहकार्यच असेल. अर्चना पाटलांनी २०२४ मध्ये ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती.












