Shivsena : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे शिवसेना पक्षाच्या वतीने विराट मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठा पक्षप्रवेश सोहळा पहायला मिळाला.

राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे शिवसेना पक्षाच्या वतीने विराट मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठा पक्षप्रवेश सोहळा पहायला मिळाला. माजी आमदार विनायक पाटील यांच्यासह तब्बल 25 हजार कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे लातूरमध्ये एकनाथ शिंदे यांची ताकद कितीतरी पटींनी वाढली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती
लातूरमधील या पक्षप्रवेश सोहळ्याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. शिंदे यांनी म्हटले की, आजचा पक्षप्रवेश सोहळा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सोहळा असल्याचे सांगत विरोधकांच्या डोळ्यात कचरा गेला असेल तर त्यांनी येथे येऊन शिवसेनेचा हा महासोहळा पाहावा. लोकांनी आपल्या कामाची पर्वा न करता प्रेमापोटी येथे गर्दी केली आहे, त्यामुळे आजचा दिवस हा आनंदाची दिवाळी आहे.
विनायकरावांच्या प्रेमापोटी लोक इथे आले
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आजच्या या पक्ष प्रवेश सोहळ्यामध्ये 25 हजार लोकांनी प्रवेश केला आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आजचा पक्षप्रवेश सोहळा सर्वात मोठा पक्ष प्रवेश सोहळा ठरला आहे. दिल्लीमधे शेतकऱ्यांच्याबाबत बैठक होती. त्यासाठी कालची सभा आजवर ढकलली होती. आजची गर्दी ही जमावाजमव करुन आलेली नाही. विरोधकांच्या डोळ्यात जर कचरा गेलेला असेल तर इकडे या आणि उघडा डोळे बघा नीट. विनायकरावांच्या प्रेमापोटी लोक इथे आले आहेत. माझ्या लाडक्या बहीणांना मी धन्यवाद देतो. हा प्रेम जिव्हाळा विकत घेता येत नाही.

या पक्षप्रवेशामुळे विकासाचे राजकारण कुठे आहे ते कळते…
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, विनायकरावांच्या कार्यकर्त्यांनी आज आंनदोत्सव साजरा केला आहे. शेतकऱ्यांते नेते शंकर अण्णा धोंडगे हेही इथे आहेत. दिव्यांगाचे आणि शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू, आनंद परांजपे यांनी प्रवेश केला. आजचा दिवस महत्वाचा आहे. कारण विनायकरावांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे. विनायकराव पाटील यांच्या नावात विनायक आहे, ते नव्याने श्री गणेशा करीत आहेत. त्यांनी मंत्री, आमदार म्हणून काम केलेले आहे ते अनुभवी नेते आहेत. अशा या पक्षप्रवेशामुळे विकासाचे राजकारण कुठे आहे ते कळते आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाला राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार हेमंत पाटील, आमदार मंगेश कुडाळकर, माजी आमदार सुधाकर भालेराव, युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि महिला, शेतकरी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















