NCP Merger Sunetra Pawar: सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची पक्षाची सगळी सूत्रे हातात घेऊन प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना साईडलाईन केल्याची चर्चा आहे.
NCP Merger Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अंतर्गत नाराजीनाट्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या सगळ्यामुळे राष्ट्रवादीतील (NCP) काही आमदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर नाराज असल्याचीही कुजबुज सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवार यांच्याकडून सगळ्यात मोठा डाव टाकला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून पुढाकार घेतला जाण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics news)
सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नेत्यांमधील विसंवाद आणि गैरसमज दूर करण्यासाठी चर्चा होणार असल्याचे समजते. या बैठकीमध्ये आमदारांच्या अडीअडचणी च्या संदर्भात सुनेत्रा पवार आमदारांशी संवाद साधणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
NCP Crisis Praful Patel and Sunil Tatkare: EC च्या दारात टेक्निकल एरर, पक्षात पॉलिटिकल हॉरर
NCP Crisis Praful Patel and Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रांवरून चांगलंच गोंधळाचं वातावरण निर्माण झालेल आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या सहीने मागील दोन महिन्यात निवडणूक आयोगाला एकूण दोन महत्त्वाची पत्रे पाठवण्यात आली आहे. या दोन्ही पत्रात निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेले हेच पत्र ग्राह्य धरावे मागील पत्र रद्द करावेत असा उल्लेख करण्यात आलेला आहे. यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय महासचिव सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या पदांबाबत ते पदावर नसल्याचा जो संभ्रम निर्माण झालेला आहे याबाबत देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. (Maharashtra Politics)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून २६ फेब्रुवारी २०२६ रोजी निवड झाली त्याचवेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल पटेल महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांच्या देखील निवडी करण्यात आल्या होत्या. या निवड प्रक्रियेनंतर निवडणूक आयोगाला पक्षाकडून १० मार्च २०२६ ला जे बैठकीचे मिनिटस देण्यात आले त्यात प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावापुढे कोणत्याच पदाचा उल्लेख नसल्याचं समोर आलं आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांना पक्षातील महत्वाच्या पदावरून पाय उतार करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली त्यानंतर मीडियात याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर पक्षाकडून ही चर्चा चुकीची असल्याची माहिती देण्यात आली तसेच नव्याने पत्रव्यवहार करणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं. ह्या घटनेला एक महिन्या पेक्षा जास्त कालावधी उलटत असतानाचा २९ एप्रिलला पुन्हा एक राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सहीचे पत्र समोर आले त्यात देखील सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष असल्याचा तसेच प्रफुल पटेल राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्याचा कुठलाच उल्लेख नसल्याच समोर आलं आहे. यावरून दोन्ही महत्वाच्या नेत्यांना काढलं असल्याच पत्रावरून जरी लक्षात येत असलं तरी अद्याप तरी याबाबतची कुठलीही घोषणा पक्षाकडून करण्यात आलेली नाही किंवा सुनेत्रा पवार यांनी देखील याबाबत स्पष्टता दिलेली नाही. असं असताना २६ फेब्रुवारी रोजी तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या पदांच्या घोषणांचे राष्ट्रीय कार्यकारणीतील व्हिडिओ मात्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे.

त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांच्या सहीचे दोनदा वेगवेगळे बदल करून निवडणूक आयोगाला देण्यात आलेले पत्र ग्राह्य धरायचे की राष्ट्रीय कार्यकारिणीतील प्रक्रिया ग्राह्य धरायची याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यामुळे पत्रांचा घोळ पदांचा गोंधळ सुरू आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या दोन महिन्यात बदललेल्या भूमिकेवरून देखील पक्षात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सध्याचा निवडणूक आयोगासोबत सुरू असलेला पत्र प्रपंच पार्थ पवार करत आहे. म्हणजेच सुनेत्रा वहिनींची सही पार्थ पवारांची शाई हे करताना सुनेत्रा पवार त्यांना रोखू शकत नसल्यामुळे आणि प्रफुल पटेल सुनील तटकरे पक्षासोबत नसतील तर आगामी काळातील पक्षाचे एकंदरीत भविष्यच अडचणीचे असल्याचे आमदारामधे चर्चा आहे. सध्या भाजपने त्यांच्या पक्षात कोणत्याही प्रकारे राष्ट्रवादीतून इनकमिंग केलं जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पक्षातील बिघडणारी घडी सावरायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीच पुढाकार घ्यावा, अशी देखील काही आमदारांची मागणी असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
















