मध्य पूर्वेतील संकट आणि आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी जनतेला केलेल्या संयमाच्या आवाहनावर राहुल गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र टीका केली असून, याला सरकारचे अपयश म्हटले आहे.

सध्या राज्यातील आखाती देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडू लागली आहे. अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपता संपत नसल्याने आता जगभरात त्याचा फटका बसताना दिसत आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला तेल, पेट्रोल-डिझेल आणि सोने यांसारख्या वस्तूंच्या खरेदीत संयम बाळगावा, असे आवाहन केले आहे. आता या आवाहनावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सगळा त्याग सामान्य जनतेने करायचा आणि मोदी फक्त कॅमेऱ्यासमोर भाषणं देत फिरणार? असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्वीट
हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. तसेच त्यांनी मोदींनी केलेल्या आवाहनावरही भाष्य केले आहे. देशात इंधन आणि LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे… आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही फक्त इव्हेंटबाजी, फोटोशूट आणि प्रचारसभांमध्ये व्यस्त आहेत! निवडणुका जिंकण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेची अक्षरशः राख केली आणि आता जनतेलाच उपदेश देत आहेत

* पेट्रोल-डिझेल घेऊ नका * सोने खरेदी करू नका * खत कमी वापरा * खाद्यतेल कमी वापरा
म्हणजे सगळा त्याग सामान्य जनतेने करायचा आणि मोदी फक्त कॅमेऱ्यासमोर भाषणं देत फिरणार? असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
जेव्हा जगातील इतर देश संभाव्य संकटासाठी नियोजन आणि तयारी करत होते, तेव्हा मोदी आणि भाजप फक्त निवडणुका, जाहिराती, धर्मांधता आणि द्वेषाचे राजकारण करण्यात मग्न होते. राहुल गांधी सतत इशारे देत होते, पण सत्तेच्या अहंकारात बुडालेल्या मोदी सरकारने देशाला थेट संकटाच्या खाईत ढकलले. कोविड काळात लोक ऑक्सिजनअभावी मरत होते आणि हे टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे कार्यक्रम करत होते. आज अर्थव्यवस्था कोसळत असताना जनतेला काटकसर शिकवली जात आहे! मोदींच्या निष्काळजीपणाची, अहंकारी कारभाराची आणि फसव्या प्रचारराजकारणाची किंमत आज देशातील प्रत्येक सामान्य नागरिक भरतो आहे. देशाला दूरदृष्टी असलेला नेता हवा होता, पण देशाच्या माथी फक्त एक ‘इव्हेंट मॅनेजर’ मारला गेला!, असाही टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.

राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी सोमवारी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर जोरदार हल्ला चढवला. काल पंतप्रधान मोदींनी जनतेकडून त्यागाची मागणी केली, ते म्हणाले: सोनं खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका, पेट्रोलचा वापर कमी करा, खत आणि खाद्यतेलाचा वापर कमी करा, मेट्रोने प्रवास करा आणि घरून काम करा. हे त्यांचे उपदेश नाहीत, तर त्यांच्या अपयशाचा पुरावा आहे. गेल्या १२ वर्षांत देशाची अशी अवस्था झाली आहे की, जनतेला काय खरेदी करावे, काय करू नये, कुठे जावे आणि कुठे जाऊ नये हे सांगावे लागते. प्रत्येक वेळी, ते स्वतः जबाबदारीतून सुटण्यासाठी जनतेवर जबाबदारी ढकलतात. देश चालवणे हे आता एका तडजोड केलेल्या पंतप्रधानांच्या हातात राहिलेले नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी नेमके काय आवाहन केले होते?
तेलंगणामध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखाती देशांमधील तणावामुळे निर्माण झालेले गंभीर जागतिक संकट आणि वाढता जागतिक ऊर्जा दबाव लक्षात घेता, लोकांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर जपून करण्याचे आवाहन केले. त्यांनी ‘वर्क-फ्रॉम-होम’, ऑनलाइन बैठका आणि मेट्रोचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले आहे. तसेच परकीय चलनावर पडणारा भार कमी करण्यासाठी वर्षभर सोन्याची खरेदी करु नका, असा सल्लाही जनतेला दिला आहे.














