
सांगोला – भरधाव खाजगी स्लीपर ट्रॅव्हल्स वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याकडील चारीत गेल्याने झालेल्या अपघातात ६ प्रवासी गंभीर जखमी तर २० प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवार दि.९ मे रोजी पहाटे ४ वा. च्या सुमारास सांगोला मंगळवेढा रोडवरील वाढेगाव ता. सांगोला येथील आईवळे वस्ती येथे घडला आहे.
नांदेडहून कोल्हापूरकडे एम. एच.०९ ई.एल. ४५२७ या क्रमांकाची खाजगी अशोका ट्रॅव्हल्स ची स्लीपर बस भरधाव वेगाने निघाली होती शनिवार दि.९ रोजी पहाटे ४ वा. च्या सुमारास सांगोला मंगळवेढा रोडवरील वाढेगाव ता. सांगोला जवळील आईवळे वस्ती जवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स बस रस्त्यालगतच्या खड्ड्यात गेल्याने झालेल्या अपघातात फिर्यादी विशाल साबळे, वय ३६, व्यवसाय-वकिली, रा-अहमदपुर, व त्यांची पत्नी वंदना साबळे यांचेसह अन्य ४ प्रवाशी गंभीर जखमी तर अन्य २० प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची घटना घडली आहे.

अपघात पहाटेच्या सुमारास झाला ,सर्व प्रवाशी झोपेत होते,यातील अनेक प्रवाशांना हात, पाय,डोकीस गंभीर तसेच किरकोळ जखमी झाले आहेत, अपघातातील जखमीना ॲम्बुलन्स मधून सांगोला येथील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालया दाखल करण्यात आले त्यामुळे अपघातातील जखमींची नावे समजू शकली नाहीत,हा अपघात इतका भीषण होता की बस खड्ड्यात कोसळताच प्रवाशांचा आक्रोश सुरू झाला तर अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
स्थानिक ग्रामस्थांनी जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. काही वेळातच आरोग्य यंत्रणा, पोलिस प्रशासन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्याने मदतकार्याला वेग आला. या अपघातात खाजगी ट्रॅव्हल्स चे सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबत विशाल साबळे यांनी अज्ञात ट्रॅव्हल्स चालकां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.












