राज्यात अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला गती मिळाली असून, यंदा २०२६-२७ चे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे.

पुणे : राज्यात अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला गती मिळाली असून, यंदा २०२६-२७ चे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी वेगाने सुरू असून, अकरावीचे वर्ग १ जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिली.
राज्यातील अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दरवर्षी रेंगाळत असून, या प्रक्रिेयेत १० प्रवेश फेऱ्यांपेक्षा अधिक होतात. त्याचप्रमाणे दिवाळीनंतरही प्रवेश प्रक्रिया सुरू राहत असल्याने, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर सिंह यांनी सांगितले की, दरवर्षी सुमारे ९० टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश लवकर पूर्ण होतात. मात्र, काही विद्यार्थ्यांना पहिल्या फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळत नसल्याने संपूर्ण प्रक्रिया रेंगाळते. ग्रामीण भागात काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण होतात. अशावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी त्यांच्यासाठी अतिरिक्त प्रवेश फेऱ्या राबवाव्या लागतात आणि त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला उशीर होतो.
यंदा निकाल लवकरच जाहीर झाला असून, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अकरावीचे शैक्षणिक वर्ग वेळेत सुरू ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रवेशही पुढील फेऱ्यांद्वारे तातडीने पूर्ण केले जातील, असेही सिंह यांनी स्पष्ट केले. प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी, प्राधान्यक्रम निवड व कागदपत्रे अपलोड ही सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

अकरावीसाठी विक्रमी नोंदणी
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in/landing या वेबसाइटहून नोंदणी करायची आहे. या वेबसाइटवर आता नऊ हजार ५९४ ज्युनिअर कॉलेजांची नोंदणी झाली आहे. त्याचप्रमाणे सात लाख ७७ हजार २३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी करीत भाग १ भरला आहे. आता भाग २ म्हणजेच प्रवेशासाठी कॉलेजांचे प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया लवकर सुरू होईल. विद्यार्थ्यांनी तातडीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.













