228 प्रवाशांनी भरलेल्या विमानाची मोठी दुर्घटना होता होता वाचली आहे. विमानतळावरच या विमानाला आग लागली आहे. मात्र, दैवबलवत्तर म्हणून मोठी हानी टळली.

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना होता होता वाचली आहे. विमानाला टेक ऑफ घेण्यासाठी अवघा काही वेळ बाकी असतानाच विमानाला आग लागली. त्यामुळे एकच घबराट पसरली. पण विमानतळ प्रशासनाने वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. जर विमानाने उड्डाण घेतलं असतं आणि ही घटना घडली असती तर भयंकर दुर्घटना घडली असती. विमानात एकूण 228 प्रवासी प्रवास करत होते. या सर्वांचा जीव धोक्यात आला असता. मात्र, दैवबलवत्तर म्हणून मोठी हानी टळली.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्सचे LX147 हे विमान दिल्लीहून झुरिचला रवाना होणार होते. विमान धावपट्टीवर टेकऑफच्या प्रक्रियेत असतानाच एका इंजिनमध्ये बिघाड झाला आणि आग लागली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने तात्काळ टेकऑफ रद्द केले आणि तातडीने प्रवाशांना बाहेर काढण्याचे (Emergency Evacuation) आदेश दिले.
या घटनेत 6 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग लागल्याचे कळताच विमानातील सर्व प्रवाशांना तातडीने ‘इमर्जन्सी स्लाइड’च्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, काही प्रवाशांना शिडीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले, कारण ते स्लाइडचा वापर करू शकत नव्हते. या दरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु क्रू मेंबर्सनी परिस्थिती हाताळली.
अधिकार्यांनी सांगितले की, एअरबस A330 (विमान क्रमांक LX147) ने पहाटे १.०८ वाजता उड्डाण सुरू केले, त्याच वेळी त्याचे एक इंजिन निकामी होऊन त्याला आग लागली. दिलासादायक बाब म्हणजे विमानातील सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. विमानात एकूण २२८ प्रवासी आणि चार लहान मुले होती.
एअरलाइनचे अधिकृत निवेदन
SWISS एअरलाइनने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “दिल्लीत LX147 या विमानाबाबत एक घटना घडली. हे Airbus A330 विमान होते. विमानात २२८ प्रवासी आणि ४ लहान मुले (infants) होती. एअरलाइनने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक विशेष टीम तयार केली आहे.” निवेदनात पुढे सांगितले की, उड्डाण करण्याच्या काही वेळातच, रात्री १ च्या सुमारास इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यानंतर वैमानिकाने सुरक्षेचा उपाय म्हणून उड्डाण थांबवले आणि विमान रिकामे करण्याचा निर्णय घेतला.
स्थानिक एअरलाइन टीम प्रवाशांना मदत करत असून त्यांच्यासाठी नवीन फ्लाईट किंवा हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जात आहे. सर्व प्रवाशांशी संपर्क ठेवला जात असून त्यांना पुढील प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एअरलाइनने स्पष्ट केले की या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि तांत्रिक तज्ज्ञ दिल्लीत येऊन विमानाची तपासणी करतील.











