सांगोला :- सांगोला शहरातील नागरिकांसह महाराष्ट्रातील 26 नागरिक सध्या दुबई येथे अडकून पडले आहेत. पर्यटनासाठी गेलेल्या या नागरिकांचा नियोजित प्रवास संपल्यानंतर भारतात परतताना अचानक अडचणी निर्माण झाल्याने त्यांना परदेशातच थांबावे लागले आहे.
सांगोला शहरातील उत्तम चौगुले, सौ. संगीता चौगुले, डॉ. सुहास आंधळगावकर व वैशाली आंधळगावकर यांच्यासह इतर नागरिक या गटामध्ये असून, विमानप्रवासात आलेल्या अडथळ्यांमुळे त्यांचा परतीचा प्रवास पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत गेल्याने सर्व नागरिक दुबईतच अडकून पडले आहेत.
अडकलेल्या नागरिकांना सध्या आर्थिक अडचणी आल्या असल्याची माहिती समोर येत असून परदेशातील वाढता निवास व जेवणाचा खर्च त्यांच्यासाठी मोठी समस्या ठरत आहे. अनिश्चित परिस्थितीमुळे या नागरिकांसह सांगोला येथील त्यांच्या कुटुंबीयांमध्येही तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अडकलेल्या नागरिकांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. भारतीय दूतावासामार्फत विशेष व्यवस्था करून या सर्व नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणावे, अशी विनंती करत आहेत.
सांगोला येथील नातेवाईक प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधत असून, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने तातडीची पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची मागणी होत आहे. दुबईत अडकलेल्या 26 महाराष्ट्रीयन नागरिकांची सुरक्षित सुटका करून त्यांना मायदेशी परत आणण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.









