Solapur Politics : करमाळ्यातील कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नारायण पाटील यांनी मोठा विजय मिळवलाय.
Solapur Politics : करमाळ्यात विधानसभेपाठोपाठ शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar) करमाळ्यात पुन्हा एकदा अजित पवार गटाला (NCP Ajit Pawar) मोठा धक्का दिलाय. आदिनाथ कारखान्यावरही पवार गटाने सत्ता निश्चित केली आहे. करमाळा (Karmala) तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना (Adinath Sahkari Sakhar Karkhana) निवडणुकीत विद्यमान आमदार नारायण आबा पाटील (Narayan Patil) गटाने तेरा जागा मोठ्या फरकाने जिंकत माजी आमदार संजय मामा शिंदे (Sanjay Shinde) गटाचा मोठा पराभव केला आहे .. उरलेल्या 9 जागांवरही शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील गट आघाडीवर असल्याची माहिती आहे.
नारायण पाटील आणि मोहिते पाटलांच्या प्रयत्नांना मोठं यश
करमाळ्यात आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये मिळविलेल्या जोरदार यशा नंतर शरद पवार गटाचे कार्यकर्त्यांनी चक्क गहू निवडण्याच्या मशीन मधूनच गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीत शरद पवार गटाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी अजित पवार गटाचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा जोरदार पराभव करीत विजय घोडदौड सुरू ठेवली आहे .. त्यामुळे या विजयाचा जोरदार जल्लोष करमाळा तालुक्यात दिसत असून या यशामागे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांचे प्रयत्न फळाला आले आहे.
या निवडणुकीत संजय शिंदे गटासाठी राम सातपुते हे देखील प्रचार करताना दिसले होते. विशेष म्हणजे ही निवडणुकीत शिंदे बंधू आणि मोहिते पाटील घराण्याने एकमेकांविरोधात ताकद लावली होती. त्यामुळे मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा शिंदे बंधूंना पुन्हा एकदा पराभवाचा धूळ चारलीये, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
विधानसभा निवडणुकीतही शिंदे बंधूंचा पराभव
पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूरच्या शिंदे बंधूना मोठा हादरा बसला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बबनदादा शिंदे माढा विधानसभा मतदारसंघातून 6 व्यांदा निवडून आले होते,तर दुसरीकडे त्यांचे बंधू संजय शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक जिंकली होती. मात्र, या निवडणुकीत खासदार शरद पवार यांनी दोन्ही शिंदे बंधूंच्या विरोधात जोरदार प्रचार केला. संजय शिंदे आणि बबनदादा शिंदे या दोन्ही नेत्याना शरद पवारांनी पाडण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे दोन्ही नेते पराभूत झाले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर आता शिंदे बंधूंना कारखान्याच्या निवडणुकीत देखील मोठा पराभव स्वीकारावा लागलाय.