राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयात घटनापीठापुढे सुनावणी सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांसाठी सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी मुक्कामी आले आहेत.
यावेळी शिंदे यांनी स्वत:च्या शेताची पाहणी करुन शेतातील पिकाची मशागतही केली. शिंदे दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यात आहेत. ते आपल्या मूळगावी महाबळेश्वर दरे येथे आले. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते यापूर्वी गावी आले होते पण त्यांना मुसळधार पावसामुळे ग्रामदैवत उत्तरेश्वराचे दर्शन घेता आले नव्हते.
त्यामुळे गावी आल्याआल्या त्यांनी प्रथम आपल्या ग्रामदैवताचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील प्रशासकिय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील पर्यटनाच्या वाढीसाठी कशा पद्धतीने प्रयत्न करता येतील, याबाबत चर्चा केली. गावचा सुपुत्र, राज्याचा मुख्यमंत्री झाल्याने गावकऱ्यांनीही शिंदे यांचे जल्लोषात स्वागत केले.