दोन हजार रुपयांची नोट ही सर्वाधिक मूल्य असलेली नोट आहे. मात्र सध्या बाजारात दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा दिसत नाहीत. तुम्ही मागच्या वेळेस दोन हजार रुपयांची नोट शेवटी कधी पाहिली होती? काही आठवते आहे का. नाही आठवणार, कारण त्याला बरेच दिवस झाले असतील. याचे कारण आता समोर आले आहे.
मागील तीन वर्षांपासून दोन हजार रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही. त्यामुळे दोन हजार रुपयांची नोट चलनातच दिसत नाही. बाजारात दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण कमी झालेले दिसते. IANS या वृत्तसंस्थेने दाखल केलेल्या माहितीच्या अधिकाराखालील एका अर्जाला सरकारने दिलेल्या उत्तरातून ही बाब समोर आली आहे. माहितीनुसार, 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या वर्षांमध्ये दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा छापण्यात आलेल्या नाहीत.