आगामी निवडणुकीसाठी भाजपचे संघटनात्मक बांधणीवर लक्ष
सांगोला (प्रतिनिधी): आगामी निवडणुका तसेच बदललेल्या राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजपने आता संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित करत, त्या माध्यमातून आगामी निवडणुकासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी विविध कार्यक्रम देण्यात आले आहेत. संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी बुथ समित्या अधिक सक्षम करा, सदस्य नोंदणी मोहिम, पक्षाने दिलेले कार्यक्रम अधिक व्यापक नियोजन करुन यशस्वी करावे अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणं समाजातील तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे.
जिल्ह्यातील आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर, जिल्हा प्रभारी विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. राज्यातील सर्वाधिक सदस्य नोंदणी सोलापूर जिल्ह्यात झाल्याने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच संघटनात्मक निवडी करण्यासाठी मंडल स्तरावर बैठका सुरू आहेत.
यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की, तळागातील लोकांमध्ये भाजपाचे ध्येय धोरण रुजविण्यासाठी पदाधिकार्यांनी, कार्यकर्त्यांनी काम करावे. भाजप पक्षामध्ये पक्षसंघटनेला फार महत्त्व आहे. गावपातळीवरील कार्यकर्ता हा भाजपचा महत्त्वाचा दुवा आणि ताकद आहे. पक्षसंघटना बांधणीला सर्वाधिक महत्त्व असल्यामुळे त्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पदे देऊन काम करण्याची संधी दिली जाते. वशिला किंवा जवळचा म्हणून कोणालाही पद दिले जात नाही, याची नोंद कार्यकर्त्यांनी घेऊन पक्षसंघटना वाढीसाठी आपला वेळ द्यावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले. भाजपने विकास कामांच्या जोरदार संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची पकड मजबूत केली आहे.
भाजपचे बुथस्तर व गावागावात पोहचलेले संघटन हे कार्यकर्त्यांच्या बळाचे फलीत आहे. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेल्या योजना व निर्णय हे कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. कार्यकर्त्यांनी जागरूक राहून काम करावे. सक्षम कार्यकर्ता हीच भाजपची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले.