विकासाच्या मुद्द्यावर मत द्या; सांगोल्यात महायुतीशिवाय पर्याय नाही – माजी आमदार शहाजीबापू पाटील

चोपडी गटात परिवर्तनाची चाहूल; चेतनसिंह केदार सावंत यांना विजयी करण्याचे आवाहन

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात गेल्या काही वर्षांत विकास कामांचा ठसा उमटलेला असून शेती, पाणी, रस्ते व वीज यासारख्या मूलभूत प्रश्नांवर निर्णायक काम झाले आहे. ग्रामीण भागाचा विकास केवळ आश्वासनांवर नव्हे तर ठोस कृतीतून साध्य करायचा असेल तर महायुतीला साथ देणे काळाची गरज आहे, असे ठाम मत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.

चोपडी जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत आणि राजुरी पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉ. सदाशिव दबडे यांच्या प्रचारार्थ मानेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

यावेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत तालुक्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करण्यात आले. विविध जलसिंचन योजना, कालवे व पाणी साठवण प्रकल्पांमुळे बागायती शेतीचे प्रमाण वाढले असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे. ग्रामीण रस्त्यांची कामे, पिण्याच्या पाण्याच्या योजना, वीजपुरवठा व डीपीचे अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लागले आहेत. केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने निधी मिळवण्यात अडचणी येत नाहीत. हाच विकासाचा धागा जिल्हा परिषद व पंचायत समितीपर्यंत पोहोचवायचा असेल, तर तेथेही महायुतीची सत्ता येणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे चोपडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत आणि राजुरी पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉ. सदाशिव दबडे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.

यावेळी उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता आल्यास पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल. विकासाचा फायदा सामान्य माणसापर्यंत पोहोचवणे हेच महायुतीचे धोरण आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आपला निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रचार सभेला सरपंच बंडू बाबर, तानाजी बाबर, विश्वनाथ आप्पा बाबर, दादासाहेब बाबर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यावर महायुतीला स्पष्ट पाठिंबा देत विजयाचा निर्धार व्यक्त केला.