सांगोला (वार्ताहर) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या माजी संस्था अध्यक्षा कै.शोभनतारा उर्फ बाईसाहेब झपके यांच्या 27 व्या स्मृतिदिनानिमित्त सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे नूतन उपाध्यक्ष, सांगोला शहरातील ज्येष्ठ विधीज्ञ विजयसिंह चव्हाण यांच्या शुभहस्ते संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे व संस्था कार्यकारणी सदस्या सौ.शीलाकाकी झपके यांच्या प्रमुख उपस्थितीत कै.बाईसाहेब व कै.बापूसाहेब यांच्या प्रतिमांचे पुष्पहार समर्पण करून पूजन करण्यात आले.
कै.शोभनतारा उर्फ बाईसाहेब झपके या त्यांच्या मनस्वी स्वभाव, प्रेमळ व निगर्वी व्यक्तिमत्वाने सांगोला परिसरास परिचित होत्या. थोर शिक्षण महर्षी कै.चंद्रशेखर विश्वनाथ तथा बापूसाहेब झपके यांच्या अतुल्य सामाजिक व शैक्षणिक कार्यात सुविद्य पत्नी म्हणून त्या सहभागी होत्या. उदारदृष्टी, सहकार्य भावना, सेवाभावी वृत्ती, सामाजिक व शैक्षणिक कार्याच्या विशेष आवडीने व सहृदयतेने संपन्न, हसतमुख चेहऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाला शहर व परिसरात “बाईसाहेब” या नावाने आदरपूर्वक ओळखले जात होते. सांगोला नगरपरिषदेच्या पहिल्या शासन नियुक्त महिला नगराध्यक्षा म्हणून 5 फेब्रुवारी, 1974 ते 16 डिसेंबर, 1974 या काळात केलेले कार्य आजही विकास रूपाने सांगोलकरांना अनुभवायास मिळते.1962 च्या भारत-चीन युद्ध दरम्यान जखमी सैनिकांसाठी रक्तदान करणाऱ्या “पहिल्या महिला” म्हणून ही बाईसाहेबांचा आदराने उल्लेख होतो. शिक्षण महर्षी कै.बापूसाहेब झपके यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात शिक्षणसेवेसाठी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी कै.बापूंच्या तत्त्वानिशी जोपासली. कै.बाईसाहेबांचे जीवन कार्य म्हणजे आजच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे.
संबंधित बातम्या
या कार्यक्रमावेळी प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, उत्तम सरगर, काकासाहेब नरुटे यांच्यासह प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निवेदन प्रा.राजेंद्र कुंभार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव विभागाच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



