Pune Crime News: पुण्यात काही तरुणांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला करत त्याला रक्तबंबाळ केलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
पुणे: शिक्षण आणि संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचेच उदाहरण म्हणजे स्वारगेट परिसरातील धक्कादायक घटना, पोलिसात दिलेल्या जुन्या तक्रारीचा राग मनात ठेवून काही तरुणांनी एका युवकावर जीवघेणा हल्ला केला आहे.
हल्ल्याचा धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आला असून, त्यात दोन तरुण कोयता हातात घेऊन “मारू का?” असा धमकीवजा प्रश्न विचारताना दिसत आहेत. मात्र, प्राथमिक चौकशीत पोलिसांनी सांगितले की हल्ल्यात दगडाने डोकं फोडण्यात आलं असून पीडित युवक रक्तबंबाळ अवस्थेत जखमी झाला आहे.
या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. भिमराव मानपाढे, लखन वाघमारे , या दोघांनी मिळून सोन्या होसमणी (वय 23, रा. गुलटेकडी) या तरुणावर हल्ला केल्याचा आरोप आहे.22 ऑक्टोबरच्या पहाटे दोनच्या सुमारास, स्वारगेटच्या गुलटेकडी परिसरात एका तरुणावर “आमची वर्षभरापूर्वी तू पोलिसात तक्रार केलेली” या कारणावरून आरोपींनी जीवघेणा हल्ला केला. या संदर्भात स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी संबंधित पीडित तरुणावर होसमणी टोळीने लुटण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणी या तरुणाने स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.त्यानंतर या टोळीला स्वारगेट पोलिसांनी अटक करून एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करत जेलमध्ये पाठवले होते.
वर्षभरानंतर जेलमधून सुटून आल्यावर, काल रात्री संबंधित तरुणाला या टोळीने गुलटेकडी भागात अडवले. “तू आमची तक्रार केली होती, तुझ्यामुळे आम्ही वर्षभर जेलमध्ये होतो,” या कारणावरून आरोपींनी कोयत्याने त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा एक व्हिडिओसुद्धा समोर आला आहे, ज्यामध्ये आरोपी हातात पालघन (कोयता) घेऊन “डोक्यात मारू का?” असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. या व्हिडिओ आणि सूत्रांच्या आधारे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
संबंधित बातम्या





पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, त्या वेळी आणि ठिकाणी फिर्यादी व त्यांचा मित्र थांबलेले असताना, आरोपी क्रमांक ०१ आणि ०२ हे किया चारचाकी गाडीतून खाली उतरले. त्यातील आरोपी क्रमांक ०१ ने फिर्यादी यांना शिवीगाळ करून छातीवर जोरात थाप मारत मारहाण केली. फिर्यादी यांनी त्यास विरोध केला असता, आरोपी क्रमांक ०२ हाही तेथे येऊन दोघांनी मिळून फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यानंतर आरोपी क्रमांक ०१ ने जवळ असलेला मोठा दगड उचलून फिर्यादी तसेच साक्षीदार यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. त्यावेळी फिर्यादी यांचे मित्र व साक्षीदार कृष्णा विजय सोनकांबळे हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता, आरोपी क्रमांक ०१ आणि ०२ यांनी मिळून त्यांनाही मारहाण करून जखमी केले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्या अनुषंगाने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.