डोंबिवली उमेशनगरमधील भाविकांच्या वाहनाला सोलापूर येथे भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर. अपघात होताच स्थानिक रहिवासी, मंगळवेढा पोलिसांनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी साहाय्य केले. अपघात इतका भीषण होता की वडापचा चुराडा झाला आहे.
डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर भागातील १२ रहिवाशांचा एक गट दोन दिवसापूर्वी तीर्थयात्रेच्या निमित्ताने सोलापूर, कोल्हापूर भागात मोटारीने गेला आहे. या भागातील विविध तीर्थस्थळांना भेटी देऊन हा गट सोमवारी संंध्याकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान वडाप वाहनाने सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा भागातून पंंढरपूर येथे महामार्गाने जात होता. यावेळी भरधाव वेगातील एका ट्रकने दिलेल्या धडकेत वडाप वाहनाचा चुराडा झाला. या भीषण अपघातात वडाप वाहनातील तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला. एक लहान मुलगा या अपघातात गंंभीर जखमी झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा सरकारी रुग्णालयात या अपघातामधील जखमींवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेने डोंबिवलीत शोककळा पसरली आहे. डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगरमधील विकासक सोमनाथ भोईर मालक असलेल्या शेवंता हाईट्स या इमारतीत हे रहिवासी राहत होते. केकाणे आणि गुप्ता कुटुंबातील सदस्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. एका मुलाच्या पोटात वडाप वाहनाचा पत्रा घुसला आहे. तो गंभीर आहे. त्याच्यावर तेथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुट्ट्यांमुळे फिरायला मागील तीन दिवस सलग सुट्ट्या असल्याने उमेशनगरमधील या १२ भाविक रहिवाशांनी सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर भागात महालक्ष्मी देवी, तुळजाभवनी देवी. तेथून पंढरपूरला विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन मग परतीचा प्रवास करण्याचे निश्चित केले होते. डोंबिवलीतून ते मोटारीने प्रवास करत होते. सोलापूर भागात आपल्या मोटारीतून प्रवास न करता त्यांंनी वडाप वाहनातून पंढरपूरला जाण्याचा निर्णय घेतला. वडाप वाहनातून सात ते आठ प्रवासी प्रवास करू शकतात. सोलापूर येथील वडाप वाहनाच्या चालकाने १२ प्रवासी एकाच वडाप वाहनात कोंबून बसविले. आणि या प्रवाशांना घेऊन सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा भागातून पंढरपूर दिशेने निघाला होता.

अपघात घडला
मंगळवेढा भागातून महामार्गाने पंढरपूर दिशेने जात असताना भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने वडाप वाहनाला जोराची धडक दिली. या धडकेत वडाप वाहन काही अंतर प्रवाशांसह दूरवर फेकले जाऊन नंतर ते ट्रकच्या खाली येऊन ट्रकच्या भरधाव वेगामुळे तीस फूट ट्रकबरोबर फरफटत नेले. ट्रकच्या धडकेमुळे वडापचा चुराडा झाला. धडक बसल्यानंतर काही प्रवासी वडापमधून रस्त्यावर बाहेर फेकले गेले. तर काही जण आतमध्ये वडापमध्ये चेंबले गेले. ट्रकची वडापला धडक बसताच मोठा आवाज झाला. अपघात होताच स्थानिक रहिवासी, मंगळवेढा पोलिसांनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी साहाय्य केले. अपघात इतका भीषण होता की वडापचा चुराडा झाला आहे.
संबंधित बातम्या
मृत, जखमी व्यक्ती
या भीषण अपघातात सोनम आहिरे, सविता गुप्ता, योगिनी केकाणे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कविता तुडसकर, सोनम गुप्ता, राजश्री कदम-सोनावणे, आरती गुप्ता, वेद गुप्ता, आदित्य गुप्ता, गणेश गुप्ता, रोहन केकाणे, अंजनी यादव, नवनाथ हिडकिट्टी (वडाप वाहनाचा चालक) अशी जखमींची नावे आहेत. यामधील काही भाविकांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे साहाय्य
डोंबिवलीतील भाविकांच्या वाहनाला सोलापूर येथे अपघात झाल्याचे समजताच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रात्रीच सोलापूर येथील आमदार पोटे, पोलीस अधीक्षक, जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक यांना संपर्क करून या अपघातामधील जखमींवर योग्य ते उपचार आणि आवश्यक ते साहाय्य करण्याच्या सूचना केल्या. बाळा म्हात्रे, अनमोल म्हात्रे, मनोज जोशी यांनी डोंबिवलीतून सोलापूर येथे जाण्यासाठी जखमींच्या नातेवाईकांसाठी वाहने उपलब्ध करून दिली.



