कुठे वेगवेगळे, कुठे एकत्र; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, महायुतीचे जागावाटप निश्चित

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

आगामी महाराष्ट्र महापालिका निवडणुकांसाठी महायुतीचे जागावाटप निश्चित झाले आहे. मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये भाजप-शिंदे गट एकत्र लढणार, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील.

सध्या राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठीचे मतदान पार पडले आहे. त्यानंतर आता लगेचच राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार असल्याचे बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. यात राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांची या घटक पक्षांची नेमकी भूमिका काय असेल, यावर या फॉर्म्युल्यात शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि नागपूर या शहरांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात हे पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे, नागपूरमध्ये भाजपची ताकद अधिक असूनही मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सोबत घेऊन ताकद वाढवण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी जागावाटपावर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना 50-50 च्या फॉर्म्युल्यासाठी आग्रही आहे. याउलट, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत.

पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात या दोन शहरांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची स्थानिक पातळीवर मोठी ताकद आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना निवडणुकीत अधिकाधिक संधी मिळावी, तसेच पक्षात बंडखोरी आणि अंतर्गत कटुता टाळण्यासाठी ही वेगळी रणनीती अवलंबण्यात येणार आहे. यावेळी स्वतंत्र लढून जास्तीत जास्त जागा मिळवून विरोधकांना बाजूला सारण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

नवी मुंबई महापालिकेसंदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसला तरी भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन लढण्याबद्दल सकारात्मक चर्चा सुरू आहेत. महापालिका निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या सर्व आमदारांसाठी ब्रेकफास्ट डिप्लोमसी (Breakfast Diplomacy) आयोजित केली आहे. आज सकाळी ८.३० वाजता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी हे ब्रेकफास्ट डिप्लोमसी होणार आहे. यावेळी एक बैठकही होईल.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून आगामी निवडणुकीसंदर्भात महायुतीच्या आमदारांना महत्त्वाच्या सूचना व मार्गदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. यासोबतच, विधिमंडळाच्या आगामी कामकाजासंदर्भात आणि सरकारकडून करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या आढाव्यावर देखील या बैठकीत चर्चा होणार आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon