शरद पवार यांनी बारामतीमधील गोविंद बागेतून अजित पवारांचे निवासस्थान असलेल्या सह्योग सोसायटीत जाऊन अजित पवारांच्या प्रतिमेसमोर हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली.
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाल्याने राज्यावर शोककळा पसरली असून अद्यापही महाराष्ट्र दु:खातून सावरला नाही. त्यामुळेच, राज्यभरात अजित पवारांच्या आठवणी जागवत त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली जात आहे. बारामतीमधील अजित पवारांचे निवासस्थान असलेल्या सह्योग सोसायटीतही दोन दिवसांपासून राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते पवार कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी येत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि खासदार शरद पवार यांनी सह्योग सोसायटीत येऊन अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवारांचे संपूर्ण कुटुंब येथे होते.
शरद पवार यांनी बारामतीमधील गोविंद बागेतून अजित पवारांचे निवासस्थान असलेल्या सह्योग सोसायटीत जाऊन अजित पवारांच्या प्रतिमेसमोर हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. थरथरत्या पाऊलांनी पुढे येत, सुरक्षा रक्षकाच्या हाताला हात धरुन शरद पवार पुढे आले. त्यानंतर, अजित पवारांच्या प्रतिमेसमोर डोकं खाली करुन हात जोडले. आपल्या लाडक्या पुतण्याला काकांकडून श्रद्धांजली वाहतानाचा हा क्षण सगळ्यांच्या काळजाला हात घालणारा होता. यावेळी, संपूर्ण पवार कुटुंबीय भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, शरद पवार, जय पवार, नीता पाटील, विजया पाटील, श्रीनिवास पवार, रोहित, राजेंद्र, रणजित पवार याठिकाणी उपस्थित होते. दरम्यान, अजित पवारांच्या कुटुंबीयांसोबत यावेळी शरद पवार चर्चा करणार असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार आणि त्यांची ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे, या कौटुंबिक भेटीत राजकीय चर्चा होते का, राजकारणाची पुढील दिशा यावर काही बोललं जातं का, याचीही उत्सुकता सर्वांनाच आहे.

दरम्यान, शरद पवार मुंबईहून आजच बारामतीत दाखल झाले असून पार्थ आणि जय पवार यांच्यासह बैठकही झाल्याची माहिती आहे. या बैठकीला विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांचीही उपस्थिती होती, शरद पवारांची जय-पार्थ आणि विजया पाटील यांच्यासोबत स्वतंत्र चर्चा झाल्याचे समजते.











