सांगोल्यातील नगरपालिकेच्या उर्वरित दोन जागांसाठी भाजप शिवसेनेची युती झाली असून शहाजी बापू पाटील यांच्या पुढाकाराने आज गुरुवारी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने दोन्ही जागा झाल्या बिनविरोध निवडून आल्या
सोलापूर: जिल्ह्यातील नगरपालिका (Nagarpalika) निवडणुका यंदा गाजल्या त्या शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji bapu patil) आणि भाजपमधील वादामुळे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऐनेवळी सांगोल्यातील शेकाप पक्षासोबत युती केल्यामुळे शिंदेंची शिवसेना इथे एकटी पडली होती. तर, महायुतीमध्ये एकत्र असूनही शिवसेना विरुद्ध भाजपा असाच सामना येथील नगरपालिका निवडणुकीत रंगला होता. तर, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने येथील नगरपालिकेच्या 2 जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार होते. मात्र, तत्पूर्वीच शहाजी बापू पाटील यांनी भाजपची (BJP) हातमिळवणी करत दोन्ही जागा बिनविरोध केल्या आहेत. त्यामुळे, वाद मिटवून शहाजी बापूंनी हातमिळवणी केल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.
सांगोल्यातील नगरपालिकेच्या उर्वरित दोन जागांसाठी भाजप शिवसेनेची युती झाली असून शहाजी बापू पाटील यांच्या पुढाकाराने आज गुरुवारी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने दोन्ही जागा झाल्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. भाजप जिल्हाध्यक्षांच्या पत्नी सुजाता केदार या भाजपकडून बिनविरोध तर शिवसेनेकडून राणी माने या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. येथील दोन्ही जागेवर दोन्ही पक्षाचे एक-एक उमेदवार विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे, आता सांगोल्यात 20 तारखेला मतदान होणार नसून 21 तारखेच्या निकालाकडेच तालुक्याचे लक्ष लागले आहे. सांगोला नगरपालिका निवडणुकीत शहाजी बापूंना भाजप आणि शेकापने एकटे पाडल्यानंतर येथे शिवसेना शिंदे सेना आणि भाजपमध्ये जोरदार लढत झाली होती. मात्र, उर्वरित दोन जागांसाठी पुन्हा भाजप आणि शिवसेना एकत्र आल्याने दोन्ही जागा बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

बिनविरोध जागांचे श्रेय पालकमंत्री गोरेंना – पाटील
भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेले गैरसमज दूर झाले असून आज बिनविरोध झालेल्या निवडणुकीचे श्रेय पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे असल्याचे शिवसेना नेते तथा माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटले. त्यामुळे, नगरपालिका निवडणुकांवेळी शहाजीबापू आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात रंगलेला वाद संपुष्टात आल्याचं दिसून येत आहे. आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकात महायुती आणि शेकाप एकत्रित लढू. मात्र, दीपक साळुंखे यांच्यासोबत कोणतीही युती आयुष्यात करणार नाही, असेही शहाजी बापू पाटील यांनी म्हटले.
संबंधित बातम्या
निवडणुकीपूर्वी भरारी पथकाची धाड
दरम्यान, नगरपालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद टोकाला पोहोचला होता. दरम्यान, 30 नोव्हेंबर रोजी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने छापा टाकला. त्यावेळी कार्यालयाची झाडाझडती घेतल्याने शिंदे सेनेचे कार्यकर्ते मात्र संतप्त झाले होते. तर, शहाजी बापू पाटील यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली होती. मात्र, अखेर शहाजी बापूंनी आज भाजपसोबत हातमिळवणी केली आहे.





