Sangola : सांगोला शहर व तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर; गुरूवार दि.5 जून 2025

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Sangola Breaking News; महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, सांगोला तालुक्यातील घडामोडी पाहा एका क्लिकवर, ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडे्स, सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडे्स, सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

 

आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांची राज्याच्या धर्मादाय खाजगी रुग्णालय तपास समिती संचालक पदी निवड

सांगोला (प्रतिनिधी):- राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्ष यांनी महाराष्ट्र सरकारच्या धर्मादाय खाजगी रुग्णालय तपासणी समितीवर सांगोला विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांची निवड केली.
विधान मंडळाच्या ज्या काही महत्वाच्या समीत्या आहेत, त्यातील पंचायत राज समिती व आता नव्याने निवड करण्यात आलेली धर्मादाय खाजगी रुग्णालय तपासणी समिती असुन , राज्य सरकारने आमदार डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांची धर्मादाय खाजगी रुग्णालय तपासणी समितीवर निवड केली आहे.
आमदार डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांची राज्याच्या पंचायत राज्य समितीवर निवड झाल्या नंतर महत्वाच्या आशा धर्मादाय खाजगी रुग्णालय तपासणी समितीवर निवड झाल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली आहे.

सांगोला आगारास प्रादेशिक सर्वेक्षण समितीची भेट: स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत केली बसस्थानकाची पाहणी

सांगोला(प्रतिनिधी):-हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर व स्थानक अभियान अंतर्गत मूल्यमापन समितीने सांगोला येथे बसस्थानक व परिसर स्वच्छता व सुंदरीकरण, चालक-वाहक विश्रांती गृह, प्रवाशांस देण्यात येणार्‍या सोयीसुविधांचे मूल्यमापन केले.
दि.4 जून 2025 रोजी रा.प.सांगोला बस स्थानकाची स्वच्छता सर्व्हेक्षण नाशिक व छत्रपती संभाजीनगर प्रदेशाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीमती अनघा बारटक्के मॅडम व प्रादेशिक अभियंता श्री पन्हाळकर यांचेमार्फत करणेत आले.सांगोला बसस्थानक हे अ वर्ग मध्ये येत असून सदर बसस्थानक 500 पेक्षा जास्ती फेर्‍या दररोज सुटत असतात. सांगोला बसस्थानकाची पाहणी केली असता त्यांचेकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
प्रवाशांना आवश्यक असणार्‍या सर्व सोयी-सुविधा देऊन सांगोला बसस्थानक परिसर प्रसाधनगृह नियमित स्वच्छ ठेवणेच्या तसेच प्रवाशांकरिता बाग बगीच्या करणेच्या सूचना त्यांनी आगार व्यवस्थापक यांना दिल्या. यावेळी आगार व्यवस्थापक श्री.विकास पोपळे, कार्यशाळा प्रमुख श्री.विकास पारसे, स्थल प्रमुख श्री.पंकज तोंडे उपस्थित होते.

वाटंबरे येथे लांबपल्ल्याच्या एसटी बस थांबा मिळावा; अन्यथा रस्त्यावर झोपून आंदोलन करणार

सांगोला (प्रतिनिधी):- वाटंबरे गावात एसटी महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेस 31 वर्षे पत्रव्यवहार करूनही थांबत नाहीत. त्यामुळे प्रवासी नागरिकांची गैरसोय होत आहे. वारंवार मागणी करूनही एसटी महामंडळ दखल घेत नसल्याने वैतागून समाजसेवक महादेव पवार यांनी राज्य परिवहन महामंडळाला निर्वाणीचा इशारा देत प्रशासनाकडे चक्क रस्त्यावर झोपून आंदोलन करण्याची परवानगी निवेदनाद्वारे मागितली आहे.
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सांगोला तालुक्यातील वाटंबरे हे गाव खंडोबा देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील असंख्य भाविक खंडोबाची यात्रा, देवदर्शनासाठी येतात. वाटंबरे गावाच्या आजूबाजूला अजनाळे, यलमार मंगेवाडी, चिनके, राजुरी, मानेगाव, निजामपूर, अकोला आदी गावांतील नागरिकांना रत्नागिरी, नागपूर, मिरज, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर येथे जाण्यासाठी वाटंबरे सोयिस्कर ठिकाण आहे. या ठिकाणी शाळा, महाविद्यालय, राष्ट्रीयीकृत बँका, मोठे व्यवसाय आहेत. प्रवाशांना चढ-उतार करण्यासाठी लांबपल्ल्याच्या एसटी बस थांबतच नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सांगोला आगारप्रमुख, सोलापूर विभागीय नियंत्रकांकडे पत्रव्यवहार केला. परंतु, राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकार्‍यांनी त्यांच्या मागणीची दखल घेतलेली नाही.

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा; नाझरे, वझरे परिसरातील शेतकर्‍याची मागणी

नाझरे (वार्ताहर):- नाझरे, वझरे ता. सांगोला येथील शक्तीपीठ बाधित शेतकर्‍यांची बैठक नाझरे येथील खंडोबा मंदिर वझरे येथील अंबाबाई मंदिर येथे संपन्न झाली व यामध्ये एकच जिद्द शक्तिपीठ रद्द अशा घोषणा देऊन, शक्तीपीठ रद्द करा अशी एक मुखी मागणी करण्यात आली.
शक्तीपीठ महामार्गासाठी येथील कसदार जमिनी जाणार आहेत व जमिन आमची आई आहे व आईस आम्ही विकणार नाही तसेच यावर आमची रोजी रोटी आहे, जमिनी देऊन आम्ही खायचे काय असा सवाल शेतकरी वर्ग करीत आहे व शक्तिपीठासाठी नाझरे येथून चार किमी अंतरावर समांतर रोड असताना हा नवीन रोड काढून ठेकेदारांना जगण्याचा महाराष्ट्र शासनाचा हेतू चांगला नाही व या अगोदरच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी रोड होणार नाही असे सांगितले परंतु सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी व शासनाने शेतकर्‍यांचा विरोध असताना हा मार्ग रेटण्याची गरज काय आहे व यासाठी मोजणी येणार्‍या अधिकार्‍याला आम्ही येऊ देणार नाही व मोजू देणार नाही असा ठराव बैठकीत करण्यात आला.
यावेळी डॉ.सोनवणे, शिक्षक नेते दादासो वाघमोडे, हरिश्चंद्र बनसोडे, दत्तात्रय पाटील, गंगाधर जोंधळे, रविराज शेटे व माजी सरपंच विजयकुमार देशमुख, राजू पाटील, दत्ता देशपांडे भारत बनसोडे यांनी हा मार्ग सरकारने रद्द करावा असे यावेळी सांगितले. तसेच हजारो एकर सुपीक जमिनी, विहिरी, पाईपलाईन, बोरवेल, फळबागा, घरे, बंगले यांना फटका बसणार असून यासाठी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा व शक्तिपीठ रद्द करावा तसेच शेतकर्‍यांना भूमिहीन करू नका व कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ होऊ देणार नाही असा पवित्रा नाझरे व वजरे येथील शेतकर्‍यांनी घेतला आहे. यावेळी बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगोला तहसीलमधील महसूल अधिकारी, कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तहसील कार्यालयातील महसूल अधिकारी, कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.
महसूल खात्याचे अधिकारी मिलींद पेठकर यांची सहाय्यक महसूल अधिकारी अन्नधान्य वितरण विभाग सोलापूर येथे, संजय गांधी विभागातील श्रीमती ए.एस.दराडे यांची मंडल अधिकारी होटगी सोलापूर येथे, संजय गांधी विभागातील आर.एस. जुंदळे यांची रोजगार हमी योजना विभाग मंगळवेढा येथे, बी.आर. उगले यांची शेतजमीन न्यायाधिकरण मंगळवेढा येथे, निवडणूक शाखेतील अमोल देशमुख यांची महसूल सहायक मंगळवेढा येथे, पी.डी. कांबळे तलाठी यांची संगवाड दक्षिण सोलापूर येथे, औदुंबर लिगाडे तलाठी यांची राजुरीहून मेडशिंगी येथे, योगेश्वर बोधमवाड तलाठी यांची कोळा येथून माळीनगर, ता.माळशिरस येथे, एम.आर. गायकवाड तलाठी यांची गायगव्हाण येथून लोणंद, ता. माळशिरस येथे, पी.बी. आलदर तलाठी यांची जुजारपूरहून किडेबिसरी येथे, किरण वाडीवाले तलाठी यांची टाकळी, ता.पंढरपूर येथे, गणेश पंडीत तालाठी यांची मंगळवेढा येथून कमलापूर येथे, श्रीम. पुनम कडलासकर तलाठी यांची वाकी (शिवणे) येथून राजूरी येथे, श्रीम.अर्चना मागाडे महसूल सहाय्यक पंढरपूर यांची सांगोला येथे, सूर्यकांत डिकोळे मंडल अधिकारी कुर्डुवाडी यांची जवळा येथे, समीर मुजावर यांची गोदाम व्यवस्थापक पंढरपूर येथे, व्ही.बी. जाधव मंडल अधिकारी जवळा यांची लवंग, ता.माळशिरस येथे, एस.डब्ल्यू. कुंभार सहाय्यक अधिकारी पंढरपूर यांची सांगोला येथे, श्रीम. व्ही.बी. डोंबाळे सहाय्यक महसूल अधिकारी पंढरपूर यांची सांगोला येथे, श्रीरंग लोखंडे तलाठी कमलापूर यांची वाकी (शिवणे) येथे, सोमनाथ माने तलाठी यांची माळशिरसहून गायगव्हाण, ता.सांगोला येथे, मधू वाघमोडे तलाठी यांची किडेबिसरीहून चिणके येथे, श्रीम. अपर्णा मोरे तलाठी यांची चिणके येथून लोणविरे येथे, विशाल जकाते तालाठी मांजरी यांची बोहाळी, ता.पंढरपूर येथे.
वरील अधिकारी व महसूल कर्मचारी यांच्या प्रशासकीय बदल्या शासनाने केल्या असल्याची माहिती सांगोला तहसीलचे निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांनी दिली.

शिवसेना नेते कमरुद्दीनभाई खतीब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सांगोला (प्रतिनिधी):- शिवसेना नेते व सामाजिक कार्यकर्ते कमरुद्दीनभाई खतीब यांचा 60 वा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न झाला. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या मनोगतातून कमरूद्दीनभाई खतीब यांच्या कार्याचा गौरव करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी मनोगतात सांगितले की, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते कमरूद्दिनभाई खतीब यांना आम्ही कधीही अंतर देणार नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन नातं व मैत्री जपणारे कमरूद्दीन खतीब हे आहेत. एकनिष्ठा व तत्व काय असते हे स्व. आम. गणपतराव देशमुख यांच्याकडून शिकायला मिळाले. आबासाहेबांच्या नंतर पक्षाशी व आपल्या नेत्याशी एकनिष्ठ असणारे व्यक्तिमत्व म्हणजे कमरुद्दीनभाई खतीब या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करावा लागेल असे विचार आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्ते कमरूद्दीनभाई खतीब यांचा वाढदिवसानिमित्त भव्य असा सत्कार- सन्मान करण्यात आला. यावेळी वसंतजी हंकारे याच्या व्याख्यानामुळे उपस्थित जनसमुदायाच्या डोळ्यात पाणी आले. आई- बाप आणि आजची मुलगी या विषयावर बोलताना वसंत हंकारे यांनी जनसमुदायामध्ये जनजागृती करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी हाजी शब्बीर खतीब, शिवसेना युवानेते तुषार इंगळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी संभाजीराजे शिंदे , धनंजय काळे, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, माजी नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर, प्रा.संजय देशमुख, सतीशभाऊ सावंत, अरविंद केदार, बापूसाहेब भाकरे, फिरोज खतीब, धर्मराज बोराडे, बापूसाहेब ठोकळे, तानाजीबापू बनसोडे, हसन पठाण, सय्यद खतीब, संजय तोडकरी, विजयसिंह इंगवले, फारूक आतार, रघुनाथ ऐवळे, डॉ.सैफुन तांबोळी, तय्यब बागवान, शेखर गडहिरे, बाळू हातेकर यांच्यासह आदी मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, मित्रपरिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगोला : सहा गावांतील 9 टँकर बंद, शिरभावी योजना बंदच

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्यानंतर राजापूर, एखतपूर, शिवणे, इटकी, कमलापूर व चिणके अशा सहा गावांतील 9 टँकर बंद केले आहेत. दरम्यान, उन्हाळा संपला तरीही शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना थकीत वीज बिलापोटी बंदच असून सांगोला तालुक्यातील यलमर मंगेवाडी, खवासपूर व लोटेवाडी अशा तीन गावांना तीन टँकरद्वारे दैनंदिन 5.5 खेपा करून सुमारे 5 हजार 817 नागरिकांना पिण्याचा पाणीपुरवठा सुरूच आहे.
चालू वर्षी भीषण उन्हाळ्यामुळे सांगोला तालुक्यातील एखतपूर, यलमर मंगेवाडी, राजापूर, शिवणे, इटकी, कमलापूर, खवासपूर, चिणके व लोटेवाडी ग्रामपंचायतींकडून संबंधित गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा अशा मागणीचे प्रस्ताव ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तहसील कार्यालय यांच्याकडे सादर केले होते. ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता व शाखा अभियंता यांनी संबंधित गावांना भेटी देऊन टँकर मंजुरीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पाठवून दिले होते.
जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीनंतर सांगोला तालुक्यात 9 गावांत 11 टँकरद्वारे 19 खेपा करून सुमारे 19 हजार 844 बाधित लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू होता. समाधानकारक पावसामुळे अंशतः राजापूर, एखतपूर, शिवणे, इटकी, कमलापूर व चिणके अशा सहा गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाल्यामुळे प्रशासनाकडून 8 टँकर तातडीने बंद केले असून सध्या तीन गावांत तीन टँकरने 5.5 खेपा करून सुमारे 5,817 नागरिकांना पाणीपुरवठा सुरू असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता प्रसाद काटकर यांनी सांगितले.

कासळगंगा फाउंडेशनच्या महेंद्र महाजन नदी प्रहरी पुरस्काराने सन्मानित

महूद (वार्ताहर):- राजस्थान मध्ये पर्यावरण आणि जल संरक्षण क्षेत्रात सामाजिक भावनेने काम करणार्‍या तरुण भारत संघ या संस्थेच्या वतीने महूद येथील कासळगंगा फाउंडेशनच्या महेंद्र महाजन यांना भीकमपुरा राजस्थान येथे जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह यांच्या हस्ते नदी प्रहरी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
राजस्थान मधील अलवर जिल्ह्यातील ग्रामीण भागात तरुण भारत संघ ही स्वयंसेवी संस्था पर्यावरण क्षेत्रात काम करते आहे.सन 1975 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे अध्यक्ष जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह हे आहेत. राजस्थान मधील ग्रामीण भागात जलसंरक्षण आणि जलप्रबंधन या क्षेत्रात या संस्थेने मोठे योगदान दिले आहे. या संस्थेचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम नुकताच भीकमपुरा(जि.अलवर) येथे पार पडला. या कार्यक्रमात महूद येथील कासळगंगा फाउंडेशनचे महेंद्र महाजन यांना डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते नदी प्रहरी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह यांचे मार्गदर्शनाखाली महेंद्र महाजन व त्यांच्या सहकार्‍यांनी लोकसहभागातून कासाळगंगा फाउंडेशनच्या माध्यमातून सांगोला,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातून वाहणार्‍या आणि या परिसरातील 23 गावे-वाड्यांची अर्थवाहिनी असलेल्या कासाळगंगा नदीचे पुनर्जीवन करण्यात आले आहे. कासाळगंगा नदी चंद्रभागा नदीची उपनदी म्हणून साकारली आहे. या परिसरात जलसाखळी निर्माण करण्यात यश मिळवले आहे.लोकसहभागातून दुष्काळ आणि पूरमुक्तीचे छानसे मॉडेल तयार केले आहे. या कामाची दखल घेऊन केंद्र सरकारने यापूर्वीच महूदला नॅशनल वॉटर अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित केले आहे.

कोळा येथे अतिक्रमण हटाव मोहीम; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

कोळा (वार्ताहर);- कोळा ता. सांगोला येथील कोळा-जुनोनी रस्ता, गौडवाडी-पाचेगाव रस्त्यावर व्यवसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे ये जा करण्यासाठी रस्ताच अपुरा पडत असल्याने गावातील रस्ते अरुंद व कोंदट झाले होते. कोळा गाव हे सांगोला तालुक्यातील मुख्य गाव असल्यामुळे नागरिकांसह वाहनांची नेहमीच रेलचेल असते. परंतु मुख्य रस्त्यावरच अतिक्रमण असल्यामुळे वाहनधारकांसह बर्‍याच एस टी बसेस या गावात प्रवेश न करता गावाबाहेरुनच जाणे पसंत करतात.
ग्रामपंचायतीने दोन दिवसापासून कोळा जुनोनी रस्ता व गौडवाडी – पाचेगाव या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम राबवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला असून या मार्गावरील व्यवसायिकांनी आपल्या दुकानांसमोरील अतिक्रमणे स्वत:हून हटविली तर काही ठिकाणी जेसीबी च्या सहाय्याने हटविण्यात आली. तर काही हातावरील पोटे असणार्‍या व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी जागा नसल्याने अशा व्यवसायिकांनामधून या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.
या अतिक्रमण मोहिमेसाठी पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी आपल्या पोलिस फौज फाट्यासह अतिक्रमण धारकांना सज्जड दम देवून मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात केली. कोळा एस टी स्टॅन्ड परिसर हा नेहमीच गजबजलेला असून या ठिकाणी नेहमीच वाहनाची वर्दळ मोठ्या प्रमाणात असुन वाहनधारकांनी आपली वाहने रस्त्यावरच लावल्याने नेहमीच या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती. सदरच्या रस्त्यावरील अतिक्रमणे ग्रामपंचायतीने काढल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon