Tanaji Sawant Vs Ranajagjitsinha Patil : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर सुटलेले विनोद गंगणे हे भाजपच्या तिकिटावर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यावरुन तानाजी सावंत यांनी टीका केली आहे.
धाराशिव : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरुन शिंदेंचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी भाजपच्या आमदारांवर टीका केली आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला नगराध्यक्ष केलं आहे, त्यामुळे तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ते आता ड्रग्जची पुडीही देतील असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. तुळजाभवानी मंदिरातील गाभारा तोडफोड प्रकरणी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांना दोषी धरत तानाजी सावंत यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर सुटलेले विनोद गंगणे हे भाजपच्या तिकिटावर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. हाच धागा पकडून आता तानाजी सावंत यांनी भाजपच्या आमदारांवर जोरदार टीका केली.
Tanaji Sawant On Tuljapur : गाभाऱ्याचं पावित्र्य कशाला भंग केलं?
तुळजाभवानी देवीचा गाभारा एक शक्तीपीठ आहे. त्याचं पावित्र्य आपण राखायला हवं. झक मारायची तर बाहेर हात लावायचा, गाभाऱ्याचं पावित्र्य कशाला भंग करतो असं म्हणत तानाजी सावंत यांनी राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर सडकून टीका केली.
आगामी जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर आमदार तानाजी सावंत यांनी धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्या मेळाव्यात बोलताना आमदार तानाजी सावंत यांनी तुळजापूर ड्रग्स प्रकरण आणि मंदिर तोडफोड प्रकरण यावरून भाजप आमदारांवर टीका केली.
संबंधित बातम्या
Tanaji Sawant Speech : तानाजी सावंतांचा भाजपला इशारा
धाराशिव नगरपरिषदेत झालेल्या पराभवाचा वचपा काढणार म्हणत तानाजी सावंत यांनी मित्रपक्षाला इशारा दिला. भूम परंडा मतदारसंघात आणलेला निधी एकत्र करा आणि मी आणलेल्या निधीपेक्षा इतरांचा निधी जास्त असेल तर राजीनामा देतो असं आव्हान तानाजी सावंत यांनी दिलं.
काम करूनही दीड हजार मतांनी निवडून येतो ही शोकांतिका आहे असं म्हणत तानाजी सावंत यांनी विधानसभेतील विजयाबाबत खंत व्यक्त केली. गद्दारी केली तर ठेचून काढणार अशा शब्दात तानाजी सावंत यांनी पक्षाविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तंबी दिली. दिवसा पक्षाचं नाव घ्यायचं आणि रात्री फितुरी करणाऱ्यांना आम्ही मानत नाही असं ते म्हणाले.



